विज्ञानविश्‍व: सीनियर सिटीझन वॅनगार्ड 

मेघश्री दळवी 

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा, युरोपियन अंतराळ संस्था आणि इतर अनेक देश सतत वेगवेगळे उपग्रह अंतराळात सोडत असतात. आपला भारत तर या बाबतीत सतत नवनवे विक्रम करत असतो. अशा वेळी कुणाला या सीनियर सिटीझनची आठवण येते का? यावर्षी साठी गाठणारा हा उपग्रह कुणाच्या लक्षात आहे का? ते वर्ष होतं 1957. त्यावेळी अंतराळ संशोधनात अमेरिका आणि रशिया, म्हणजे तेव्हाचा सोव्हिएट युनियन हे एकत्र काम करत होते. अर्थात वरवर. कारण शीतयुद्ध तर सुरू होतं, तरी शांततामय मार्गाने म्हणून अमेरिका एकत्र अंतराळ संशोधनाला तयार झाली होती. मात्र ऑक्‍टोबर 1957 मध्ये स्पुटनिक हा उपग्रह अंतराळात सोडून सोव्हिएट युनियनने अमेरिकेला चांगलाच धक्‍का दिला. तो अमेरिकेला मुळीच सहन झाला नाही. त्यातून स्पुटनिक हेरगिरी करणार ही भीती. म्हणून मग आपणही तत्काळ उपग्रह सोडायचा याचा अमेरिकेने चंग बांधला.

त्यावेळी वॅनगार्ड रॉकेट प्रकल्प प्रयोगशाळेत होता. मग तो अवकाशात सोडण्याची धांदल सुरू झाली. डिसेंबर 1957 मध्ये घाईघाईने केलेलं वॅनगार्ड रॉकेटचं उड्डाण फसलं. सगळे धास्तावले. पण त्यांनी प्रयत्न जारीच ठेवले, आणि यश नजरेच्या टप्प्यात आलं. जानेवारी 1958 मध्ये जुपिटर रॉकेटवरून एक्‍सप्लोरर-एक या अमेरिकेच्या पहिल्या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी झालं. त्यानंतर वॅनगार्ड-एक उपग्रह मार्च 1958 मध्ये यशस्वीपणे कक्षेत सोडण्यात आला. स्पुटनिक-एक आणि दोन आणि एक्‍सप्लोरर-एक यानंतर असा क्रमाने चौथा, पण आज अजूनही फिरत असलेला सर्वात जुना उपग्रह. यावर्षी त्याने साठी पूर्ण केली.

आज अंतराळात असलेल्या साडेतीन हजारांहून अधिक उपग्रहांमधला हा एकमेव सीनियर सिटीझन! त्याकाळचं तंत्रज्ञान वापरून केलेला वॅनगार्ड आजसुद्धा कक्षेत आहे यासाठी त्याच्या निर्मात्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. त्यावेळी नासाची स्थापना झालेली नव्हती. ती झाली जुलै 1958 मध्ये. म्हणून सुमारे दीड किलो वजनाचा, साडेसहा इंच व्यासाचा हा उपग्रह अमेरिकेन नौदलाच्या रिसर्च लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. त्यात बॅटरीवर चालणारा एक आणि सौरऊर्जेवर चालणारा एक असे एकूण दोन ट्रान्समीटर्स आहेत. जोडीने सहा अँटेना आहेत. यांच्या सहाय्याने वॅनगार्डने सात वर्षें सतत संदेश प्रक्षेपित केले. आज तो संदेश देऊ शकत नसल्याने त्याचं ट्रॅकिंग दुर्बीण वापरून केलं जातं.

वॅनगार्डने अनेक अमूल्य कामं त्या सात वर्षांत पार पाडली. पृथ्वीच्या आकारात उत्तर आणि दक्षिण भागात थोडा फरक आहे, हा निष्कर्ष वॅनगार्डच्या निरीक्षणांवरूनच काढण्यात आला आहे. वॅनगार्डने वातावरणाच्या घनतेच्या अनेक नोंदी घेऊन, ही घनता उंची, रेखांश, ऋतू आणि सौरप्रक्रियांवर यावर अवलंबून असते ही महत्त्वाची माहिती मिळवली.
पृथ्वीभोवती भ्रमण करत असताना स्वत:च्या तापमानाच्या नोंदीदेखील वॅनगार्डने सुरुवातीच्या काही दिवसात पुरवल्या. त्यामुळे पुढच्या उपग्रहांचे आराखडे करताना उष्णतारोधण किती लागेल आणि त्यासाठी कोणते पदार्थ वापरले पाहिजेत, याचा योग्य निर्णय करणं शक्‍य झालं. या वर्षी मार्च 2018 मध्ये वॅनगार्डने साठी पार केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)