विज्ञानविश्‍व : वैद्यकशास्त्रात एआय   

मेघश्री दळवी 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात अतिशय झपाट्याने वाढू लागला आहे. अलिकडे बॅंकिंग, रीटेल अशा क्षेत्रांमध्ये एआयचा वेग आणि डेटा हाताळण्याची प्रचंड क्षमता याचा उत्तम वापर करून घेतलेला दिसतो. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय यावर शास्त्रज्ञांचा ऊहापोह बराच काळ सुरू आहे. पण उद्योगधंद्यांमध्ये मात्र याचा मर्यादित अर्थच घेतला जातो. ज्या कामासाठी एआयचा वापर करणार, त्यातल्या खुब्या समजून, उपलब्ध डेटाचं विश्‍लेषण करून, योग्य अर्थ लावून निर्णय द्यायचा एवढंच तिथे अपेक्षित असतं.
अर्थात हे सगळं करत असताना, त्यातून शिकत राहायचं, आणि त्या ज्ञानाचा वापर करून विश्‍लेषण अधिकाधिक अचूक करत राहायचं यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरलं जातं. आपण माणसं ज्या प्रकारे अनुभवातून शिकत समृद्ध होत जातो, त्याप्रमाणे मशीन म्हणजे संगणकाने अनुभवातून शिकावं यासाठी मशीन लर्निंगचा उपयोग होतो.

आज वैद्यकशास्त्रात एआय दिसायला लागला आहे, तो मुख्यत: रोगनिदान म्हणजे डायग्नोसिस करण्यासाठी. त्वचेच्या कर्करोगाचं निदान करताना एआय व निष्णात डॉक्‍टर्स, दोघांचीही मदत घेण्यात आली. त्यात डॉक्‍टरांचं निदान 87% वेळा तर एआयचं निदान 95% वेळा अचूक होतं. लंडनमध्ये डोळ्याच्या आजारासाठी असाच अभ्यास गुगल डीपमाइंडच्या एआय प्रणालीच्या मदतीने केला. त्यात डायबेटिक रेटीनोपथी आणि मॅक्‍युलर डीजेनरेशन या रोगांचं निदान अचूकपणे करण्यात ही प्रणाली यशस्वी झाली.

कोमात गेलेले रुग्ण कोमातून कधी बाहेर पडू शकतील, याचा अंदाज बांधण्यासाठी मेंदू स्कॅनिंगसह अन्य चाचण्या केल्या जातात. त्यावरून रुग्णाची बरे होण्याची शक्‍यता निश्‍चित केली जाते. चीनमधील एका हॉस्पिटलमध्ये यासाठी एका एआय प्रणालीला अनेक केसेसचा अभ्यास करून अशा शक्‍यता मोजायला शिकवलं. त्यानंतर ती प्रणाली काही नव्या केसेसवर वापरण्यात आली. त्यात 90% वेळा तिने अचूक अंदाज सांगितला. डॉक्‍टरांच्या अनुभवावरून तयार झालेले आडाखे आणि एआयचं अचूक निरीक्षण या दोघांचा संगम करून ही प्रणाली आता अनेक वेळा अगदी नेमके अंदाज सांगू शकते.

न्यूयॉर्कममध्ये एआयला सीटी स्कॅन पाहून त्याचा अर्थ लावण्याचं काम दिलं आहे. एका स्कॅनवरून पूर्ण निदान करायला त्या प्रणालीला केवळ 1.2 सेकंद लागतात. इतक्‍या वेगाने निदान झाल्यामुळे तिथे अनेक रुग्णांचे जीव वाचलेले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये नैराश्‍याचं (डिप्रेशन) निदान करण्यासाठी एआय वापरून एक प्रयोग केला. या प्रयोगात प्रत्येक व्यक्ति आपला स्मार्टफोन कसं हाताळते यावरून एआय प्रणालीने तपशीलवार विश्‍लेषण केलं आहे. त्यात प्रत्येकाने फोन कसा धरला आहे, त्यातील ऍप कसे टॅप किंवा स्क्रोल करत आहेत, किती वाचून पुढे जात आहेत, यावरून त्यांच्या मन:स्थितीचा अंदाज केलेला आहे.

रोगनिदानाच्या जोडीने उपचार (थेरपी) आणि प्रतिबंध (प्रिव्हेन्शन)या क्षेत्रांमध्येही एआय वापराचे प्रयोग सुरू झाले आहेत. नवीन औषध बाजारात आणताना एआयची मदत घेण्याचाही विचार पुढे येतो आहे. नवीन औषधांच्या वैद्यकीय चाचण्या घेताना प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध होतो. त्यात पेशंटची माहिती, वैद्यकीय नोंदी, त्याने औषधाला दिलेला प्रतिसाद या सगळ्याचा योग्य मेळ घालून मगच निष्कर्ष काढता येतो. क्‍लिनिकल चाचण्यांमधल्या या डेटाचं योग्य प्रकारे विश्‍लेषण करायला वेळ लागतो. तिथेही एआयचं नक्कीच स्वागत होईल. एआय आणि माणूस यात एक मुख्य फरक आहे. एखादा तज्ञ अनेक वर्षं अनुभव घेऊन जे कौशल्य आत्मसात करत असेल, जे नैपुण्य मिळवत असेल, ते दुसऱ्या तज्ञाकडे तसंच्या तसं सुपूर्द करता येत नाही. मात्र एका एआय प्रणालीने एखादं कसब शिकून घेतलं असेल, तर तिच्या पटापट आवृत्त्या काढून त्या सगळीकडे लगेच वापरता येतात. याबाबतीत एआय वरचढ ठरतो. म्हणूनच वैद्यकशास्त्रातल्या एआयच्या वापराने महत्वाचं ज्ञान आणि कौशल्य सर्वांपर्यंत नेणं सहज शक्‍य होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)