विज्ञानविश्‍व : महत्त्व कार्बन बजेटचं 

मेघश्री दळवी 

औद्योगिक क्रांती झाल्यावर मोठमोठ्या उद्योगधंद्याना एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरुवात झाली. त्यानंतरच्या गेल्या दीडशे वर्षांत जगाचं सरासरी तापमान वाढतच चाललं आहे. याच्यामागे अर्थात आहे कारखान्यांमधून, वाहतुकीच्या साधनांमुळे, आणि इतर कारणांनी होणारं कार्बन डायऑक्‍साइड आणि तत्सम वायूंचं उत्सर्जन. हे वायू वातावरणातील थरात जाऊन अडकून रहातात आणि अधिक इन्फ्रारेड विकिरण शोषून घेतात. त्यामुळे पृथ्वीवर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग परिणाम दिसतो आहे.

-Ads-

औद्योगिक क्रांती होण्याआधी जगाचं जे सरासरी तापमान होतं, त्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे या शतकात अंदाजे दोन अंश सेल्सियसने वाढ होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. प्रत्यक्षात आज फक्त एक अंश सेल्शियस वाढ असूनही हवामानात कमालीचा फरक पडला आहे. या वाढत्या तापमानाचे तडाखे आपल्याला बसत आहेत. त्यात वितळते हिमनग, दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर, उष्माघात,वनस्पती-प्राण्यांवर संबंधित परिणाम- सगळंच आलं.
म्हणूनच इंटर-गवर्नमेंटल पॅनल फॉर क्‍लायमेट चेंज (आयपीसीसी) सारख्या संस्थांची कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनावर सतत नजर असते.

या निरीक्षणानुसार आजचा अंदाज आहे दर दशकामध्ये 0.2 अंश सेल्शियसची वाढ. त्यावर ठोस उपाय केलेच पाहिजेत ही निकड आता तीव्रतेने जाणवायला लागली आहे. 2015 च्या पॅरिस करारानुसार आयपीसीसीने तापमानातील वाढ दीड अंश सेल्शियसवर रोखण्याचं आवाहन केलं आहे. इतक्‍या वाढीचे परिणाम आपण सहन करू शकू, यावर शास्त्रज्ञ आणि विविध देश यांचं एकमत झालेलं दिसतं. त्यासाठी आवश्‍यक ती बंधनं बहुतांशी देशांनी मान्य केलेली आहेत.

ही तापमान वाढ दीड अंश सेल्शियस या मर्यादेत ठेवण्यासाठी आपण आणखी जास्तीत जास्त किती कार्बन डायऑक्‍साइड वातावरणात सोडू शकू? आज याचा अंदाज आहे 500-700 गिगाटन. हेच आहे आजचं जगाचं कार्बन बजेट. येत्या तीस वर्षांत आपण या बजेटमध्येच राहायला हवं. 2010 मध्ये मानवनिर्मित कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनचं जे प्रमाण होतं, ते 2030 पर्यंत निम्म्यावर यायला हवं, आणि 2050 पर्यंत शून्यावर यायला हवं.
ज्या ज्या कारणांनी आपण कार्बन डायऑक्‍साइड वातावरणात सोडत आहोत, त्या कारणांना नियंत्रणात आणायचं आहे. खनिज इंधनांचा वापर पावपट करायचा आहे.

कोळसा आणि गॅसपासून वीजनिर्मिती आणखी करून अपारंपरिक मार्गाने वीजनिर्मितीवर भर द्यावा लागेल. वाहनं वीजेवर चालणारी असावीत किंवा हायड्रोजनसारख्या वेगळ्या इंधनाचा वापर करावा लागेल. या बाबतीत युरोप, चीन, कॅनडा यांनी आघाडी घेतलेली आहे. घातक रासायनिक खतं, रासायनिक कारखान्यांचं प्रदूषण हेदेखील मर्यादेत ठेवायचं आहे. शेती, अन्नावर प्रक्रिया करणारे कारखाने, व्यावसायिक प्रमाणावर प्राण्यांची पैदास, यांच्यामधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्‍साइड कमी करायचा आहे. त्यासाठी वेगळी आणि नवी तंत्रं वापरताना, आपल्या गरजांचा पुन्हा एकदा विचार करून अनावश्‍यक गोष्टींचं उत्पादन कमी करणं अनिवार्य
होणार आहे.

या कार्बन बजेटमध्ये राहायचं तर या सगळ्या प्रयत्नांना जोड द्यायची आहे ती वातावरणात आधीच आहे तो कार्बन डायऑक्‍साइड कमी करण्याची. जास्त झाडं लावणे, जंगलं वाढवणे हा एक मार्ग असला तरी त्यासाठी जागेची मर्यादा जाणवते. मात्र इमारतींच्या भिंतींवर व्हर्टिकल गार्डन सारखे प्रयोग करून शहरात हिरवाई जोपासता येते हेही दिसत आहे. म्हणजेच या दिशेने नवीन विचार आणि संशोधनाची गरज आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)