#विज्ञानविश्‍व: बायोप्लॅस्टिकने करा प्लॅस्टिक समस्येवर मात 

– मेघश्री दळवी 
भारतात प्लॅस्टिकबंदी झाल्यापासून प्लॅस्टिकच्या जागी काय वापरता येईल यावर खूप ऊहापोह झाला. कापडी, ज्यूटच्या, कागदी पिशव्या बऱ्याच ठिकाणी चालू शकतात. काही वेळा मात्र प्लॅस्टिकसारखं मजबूत आणि वॉटरप्रूफ काहीतरी हाताशी असावं वाटतं. अशा वेळी बायोप्लॅस्टिक चांगला पर्याय होऊ शकतो. बायोप्लॅस्टिक आणि बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक यात फरक आहे. बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक हे साध्या प्लॅस्टिकप्रमाणे पेट्रोलजन्य पदार्थांपासून बनतं.
मात्र त्याच्यात काही विशिष्ट पदार्थ वापरून ते लवकर विघटन पावेल अशी तरतूद केली असते. बायोप्लॅस्टिक हे बायो म्हणजे सेंद्रिय पदार्थांपासून बनलेलं असतं. ते प्लॅस्टिकसारखं वापरता येतं, आणि त्याचं इतर सेंद्रिय पदार्थांसारखं अगदी पटकन विघटन होतं.
काही वेळा अशा प्लॅस्टिकवर कंपोस्टेबल असा शिक्‍का असतो. याचा अर्थ पानं, फळं, फुलं, भाज्या आणि फळांची सालं-देठं अशा कुजणाऱ्या गोष्टींपासून आपण जे सेंद्रिय खत तयार करू शकतो, त्यात हे कंपोस्टेबल बायोप्लॅस्टिकही टाकू शकतो. आज बायोप्लॅस्टिकवर देशोदेशी संशोधन सुरू आहे. वापरायला सुटसुटीत हा प्लॅस्टिकचा गुण घ्यायचा, पण विघटन न झाल्याने कचरा वाढत वाढत जाण्याचा प्लॅस्टिकचा दुर्गुण टाळायचा, असा दोन्ही बाजूंनी फायदा बायोप्लॅस्टिक देऊ शकतं. पेट्रोलजन्य पदार्थ नसल्याने यात बीपीए (बिसफिनॉल ए) हा हार्मोन्सचं संतुलन बिघडवणारा घातक घटकही नसतो.
बायोप्लॅस्टिकसाठी कशाकशाचा वापर होऊ शकतो? 
इंग्लंडमधील बाथ विद्यापीठात यासाठी साखरेच्या वापरावर संशोधन सुरू आहे, तर फिनलंडमध्ये ते तांदळापासून बनवत आहेत. तुर्कस्तानमधल्या एका तरुणीने केळ्याच्या सालीपासून आणि ऑस्ट्रेलियातल्या एका शालेय विद्यार्थिनीने कोळंबीच्या सालीपासून बायोप्लॅस्टिक तयार करून दाखवलं आहे. अशा पर्यावरणस्नेही पर्यायांवर जगभर अनेक उद्योजक काम करत आहेत. ऑस्ट्रेलियातली एक कंपनी एका विशिष्ट प्रकारच्या मधमाश्‍यांकडून असा पदार्थ मिळवत आहेत.
ऑस्ट्रेलियन “मास्क्‍ड बी’ ही मधमाशी इतर मधमाश्‍यांसारखी पोळं तयार करत नाही, तर आपल्या अंड्यांसाठी एक पातळ लवचिक सेलोफेनसारखं आवरण तयार करते. हे आवरण वापरून बायोप्लॅस्टिक तयार करता येईल, असा या उद्योजकांचा दावा आहे. दुसरीकडे “सी-वीड’ हे एक प्रकारचं समुद्र शैवाल वापरून बायोप्लॅस्टिक करण्यात इंडोनेशियामधल्या एका स्टार्टअपने आघाडी घेतली आहे. “सी-वीड’ हे आग्नेय आशियात भरपूर प्रमाणात खाल्लं जात. त्याचं रीतसर फार्मिंग होतं. त्यामुळे हा पर्याय तिथे चांगलाच रूजेल. मेक्‍सिकोमध्ये ऍसव्हाकॅडो या फळापासून बायोप्लॅस्टिक बनतंय. तर अनेक ठिकाणी तळणीचं तेल फेकून देण्याऐवजी त्याच्यापासून बायोप्लॅस्टिक बनवण्यावर संशोधन सुरू आहे. आपल्याकडे अशा काही बायोप्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध झाल्या आहेत. कॉर्नस्टार्च, बटाटा, ऊस अशा पिष्टमय पदार्थांपासून तयार केलेल्या या पिशव्यांचं काही वापरानंतर विघटन होऊ लागतं. बाजारात याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)