विज्ञानविश्‍व : काय आहे यावर्षीची “इग नोबेल?’ 

मेघश्री दळवी 

नोबेल पारितोषिक हे विज्ञान जगतात अत्यंत मानाचं समजलं जातं. हा सन्मान मिळावा अशी शास्त्रज्ञांना नेहमी आस असते. नेमकं याच्या उलट म्हणजे इग नोबेल पारितोषिक! इग्नोबल या इंग्लिश शब्दाचा अर्थ आहे अतिशय सामान्य, बिन महत्त्वाचं असं काही. आणि म्हणूनच दुर्लक्ष करावं अशा संशोधनाला दर वर्षी पारितोषिक देताना इग नोबेल हे नाव दिलं आहे.
नोबेल पारितोषिकात जे जे विभाग आहेत, ते सगळे विभाग इग नोबेलमध्येही आहेत. या वर्षी वैद्यकशास्त्रात इग नोबेल मिळालं आहे ते संशोधन आहे – किडनी स्टोन शरिरातून उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी रोलरकोस्टरचा वापर. तर जीवशास्त्रातलं पारितोषिक विजेतं संशोधन आहे ग्लासातल्या वाइनमध्ये पडलेली माशी नर आहे की मादी याचा केवळ वासावरून शोध.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता असं तऱ्हेवाईक संशोधन नक्‍की कोण करत असेल अशी शंका येते ना? आश्‍चर्य म्हणजे हे सगळे संशोधक विज्ञानाचे खरेखुरे अभ्यासक आहेत. इतर प्रकल्पांप्रमाणे इथेही ते एक टीम बनवतात आणि प्रामाणिकपणे प्रयोग करून निष्कर्ष काढतात.

तुम्ही-आम्ही प्राणीसंग्रहालयात जातो. कधी पिंजऱ्यात ठेवलेले, कधी काचेआड बंदिस्त, तर कधी मोकळे वावरणारे असे प्राणी पाहतो. त्यांची माहिती घेतो. पण काही शास्त्रज्ञांचं एवढयाने समाधान होत नाही. प्राणीसंग्रहालयात ठेवलेले चिंपांझी काही वेळा माणसांची नक्‍कल करतात, तर काही वेळा लहान-थोर माणसं चिंपांझीची पोटभर नक्‍कल करून घेतात. आता या दोघांचं प्रमाण काय, हा काही संशोधनाचा विषय होऊ शकतो का? पण त्यावर शास्त्रज्ञांच्या एका चमूने भरपूर अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे की या दोन्ही नकलांचं प्रमाण सम असतं! अर्थातच या संशोधनाने मानववंश शास्त्रातलं या वर्षीचं इग नोबेल पटकवलं आहे.

इग नोबेल मिळवणारं हे सगळं संशोधन वरवर अर्थहीन वाटतं. या संशोधनाचा काही खराखुरा वापर होऊ शकतो का असंही वाटतं. नोबेल पारितोषिकाचं विडंबन म्हणून हे 1991पासून पारितोषिक सुरू झालं. कसकसले हास्यास्पद अभ्यास पाहून मनमुराद हसावं एवढंच त्यातून अपेक्षित होतं. पण गंमत म्हणजे आज ना उद्या त्यातल्या विज्ञानाला नक्‍की महत्त्व येऊ शकतं. कच्ची स्पॅगेटी वाकवली तर तिचे दोनपेक्षा जास्त तुकडे होतात असा निष्कर्ष एका फ्रेंच संशोधक चमूने काढला होता. त्यासाठी त्यांना 2006 मध्ये भौतिकशास्त्रातलं इग नोबेल मिळालं. मात्र हेच संशोधन पुढे पुलाच्या बांधकामात भेगा कशा पडू शकतात याचा अंदाज बांधण्यासाठी वापरलं गेलं.

आणखी एक अचाट उदाहरण घ्या. अंगठी गोलगोल फिरवली तर ती कशी फिरेल यावर संशोधन करून बर्कले विद्यापीठातल्या नामांकित शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला ती एखाद्या बूमरॅंगसारखी फिरते. अंगठीतल्या भोकामुळे हवेचा अवरोध विशिष्ट प्रकारे होतो हे त्यामागचं तत्त्व एरोडायनॅमिक्‍सच्या दृष्टीने खरोखरच उपयोगी आहे. त्यामुळे त्यांना 2015 मध्ये इग नोबेल मिळालेलं असलं तरी उद्या या संशोधनाचं पेटंट घेऊन ते भरपूर पैसे कमवू शकतात.

शेवटी एक गंमत. चुंबकांचा वापर करून बेडकाला अधांतरी लटकत ठेवणे असा खतरनाक संशोधन विषय होता आंद्रे गेम या फ्रेंच शास्त्रज्ञाचा. त्यासाठी त्याला 2000 मध्ये भौतिकशास्त्रातलं इग नोबेल देण्यात आलं होतं. योगायोग म्हणजे याच आंद्रे गेमला पुढे 2010 मध्ये प्रा. कोस्त्या नोवोस्लेव यांच्या सोबत खरंखुरं नोबेल पारितोषिक मिळालं. ग्राफिनवरच्या अतिशय महत्त्वपूर्ण संशोधनासाठी. आहे ना कमाल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)