विज्ञानविश्‍व: काखेत कळसा 

मेघश्री दळवी 

तेवीस वर्षांपूर्वी 1995 मध्ये सूर्यमालेच्या पलिकडला पहिला ग्रह सापडला 51 पेगासी बी. तेव्हापासून अनेक बाह्य ग्रह आपण शोधून काढले आहेत. केप्लर ही अवकाश दुर्बीण तर त्यासाठी खासच. 2009 मध्ये अवकाशात सोडलेल्या या दुर्बिणीने असे ग्रह शोधण्याचा धडाकाच लावलाआणि बाराशेच्यावर बाह्य ग्रहांची नोंद केली. त्यातले ग्लिसे 667 सीसी, केप्लर 22 बी, केप्लर 69 सी असे ग्रह अर्थलाइक म्हणजे पृथ्वीसदृश आहेत. तर ग्लिसे 581 सी, केप्लर 452 बी हे ग्रह सुपरअर्थ म्हणजे पृथ्वीसमान, पण आकाराने खूप मोठे असे आहेत.

हे सगळे ग्रह आपल्यापासून कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर आहेत. तिथे जाऊन रहाणे दूरच पण निरीक्षणासाठी म्हणून काही यानं तिथे पाठवणेही कठीण आहे. तरीही असे काही ग्रह मिळण्याचा आनंद काही औरच असतो. असाच एखादा ग्रह एकदम जवळ मिळाला तर? आपल्याला तिथे सहज ये-जा करता आली तर? नुसत्या कल्पनेनेच शास्त्रज्ञ मोहरून जातात. आणि गंमत म्हणजे असा एक सुपरअर्थ खरोखरच आपल्या जवळ, केवळ सहा प्रकाशवर्षं अंतरावर मिळाल्याचा दावा नुकताच स्पेनमधील खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. तसं असेल तर हे काखेत कळसा गावाला वळसा असं झालं म्हणायचं!

बार्नर्डचा तारा नावाने ओळखल्या जाणार्यो तार्यानभोवती हा सुपरअर्थ ग्रह 233 दिवसात एक फेरी पूर्ण करतो. त्याचं वस्तुमान पृथ्वीच्या तिपटीहून अधिक आहे. मात्र बार्नर्डचा तारा रेड ड्‌वार्फ प्रकारातला असल्याने मंद प्रकाश देतो, आणि या ग्रहापर्यंत प्रकाश कमी प्रमाणात पोचतो.

डॉ इग्नासी रीबास यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षं शास्त्रज्ञांचा हा चमू स्पेनमधील केलार आल्टो वेधशाळेत या ग्रहाचं निरीक्षण करत आहेत. सुरूवातीला त्यांचा आपल्या स्वत:च्या नोंदींवर विश्‍वास बसेना. मात्र पूर्ण अभ्यासानंतरच त्यांनी या ग्रहाविषयी आपले निष्कर्ष जाहीर केले आहेत.

बार्नर्डच्या ग्रहावर पाणी असेल का,तार्याणचा प्रकाश कमी मिळाल्याने तो बर्फमय असेल का, तिथे वातावरण असेल का,त्याच्या पृष्ठभागावर किती गुरुत्वाकर्षण असेल,बार्नर्डच्या तार्याभोवती आणखे काही ग्रह असतील का,हे सगळे प्रश्‍न अजून अनुत्तरित आहेत. मात्र त्याच्या शोधाने शास्त्रज्ञांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

स्टार ट्रेक मालिकेत किंवा हिचहायकर्स गाइड टू गॅलक्‍सी या विज्ञानकादंबरीत बार्नर्डच्या ग्रहाचा उल्लेख आहे. बार्नर्डचा ग्रह या नावाचीच जॉन बॉयडची कादंबरीसुद्धा आहे. सायन्स फिक्‍शनमधल्या कल्पना कधी कधी अशा सत्यात उतरतात खर्याब!

असे बाह्य ग्रह शोधण्याचे प्रयत्न आपण का करतो? त्या ग्रहांवर कोणी सजीव सापडतील म्हणून? त्यातले काही आपल्यासारखे बुद्धिमान असतील म्हणून? या अथांग अंतराळात आपल्याला कोणी शेजारी मिळतील याची माणसाला आस आहे. पृथ्वीप्रमाणे इतरत्रही जीवन बहरलं असेल, तर माणसाच्या मनातल्या अनेक शास्त्रीय शंका निश्‍चित मिटतील. याचसाठी माणसाची ही धडपड सुरू असते.

आतापर्यंत शोधलेले बहुतेक बाह्य ग्रह हे आपल्यापासून खूप दूर आहेत. त्यामुळे तिथे जीवन आहे का हे पहाणं कठीण आहे. आता मात्र जवळच मिळालेल्या या सुपरअर्थचं आपण यानं पाठवून निरीक्षण करू शकतो. आपल्या ग्रहाशी आणि ग्रहमालेशी तुलना करून अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळवू शकतो. बार्नर्डच्या ग्रहाचा शोध हा म्हणूनच आज अतिशय मोलाचा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)