विज्ञानविश्‍व : अटाकामातला पाऊस 

मेघश्री दळवी 

चिली देशाच्या उत्तर भागातलं अटाकामा वाळवंट म्हणजे पृथ्वीवरचा अतिशय रखरखीत वैराण प्रदेश. एक लाख चौरस किमी इतका विस्तीर्ण पसरलेलं हे वाळवंट जगातलं सर्वात जुनं आणि सर्वात उजाड समजलं जातं. काही ओऍसिसच्या जवळ अतिशय तुरळक वस्ती सोडली तर तिथे राहायला कोणी तयार नसतं. गेल्या पाचशे वर्षांमध्ये तिथे पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. मात्र आश्‍चर्य म्हणजे 2015 मध्ये पहिल्यांदा तिथे थोडा पाऊस पडला. हे अर्थात बदलत्या हवामानामुळे. जगाच्या पाठीवर कितीतरी ठिकाणी ऋतू बदलताना दिसतात. उन्हाळा-हिवाळा कडक होताना दिसतो. अनपेक्षित असे पूर किंवा दुष्काळ येताना दिसतात. अटाकामातला पाऊस असाच हवामानबदलाचा निदर्शक होता. 2015 तिथे दोनदा पाऊस झाला, तर 2017 मध्ये परत एकदा.

एकीकडे या उजाड प्रदेशात पाण्याची चक्क छोटी छोटी तळी दिसल्याचा आनंद झाला, तरी शास्त्रज्ञांनी या घटनेचा नीट अभ्यास करायचं ठरवलं. त्यानुसार अमेरिकन आणि स्पॅनिश ऍस्ट्रोबायोलॉजिस्ट्‌सनी तिथे तळ ठोकला.
अवकाशात सजीव असतील का, तिथे जीवांचा उगम वेगळा असेल की आपल्यासारखाच, त्यांच्या पेशी निराळ्या असतील का, डीएनए कसे असतील याचा अभ्यास ऍस्ट्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. तो करताना पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सजीव कसे जगतात, कसे उत्क्रांत होत जातात, याचा आधार घेतला जातो. त्यादृष्टीने अटाकामा मंगळासारखा आहे आणि तिथल्या अभ्यासाने मंगळ ग्रहाची परिस्थिती समजायला मदत होते. त्यामुळे हा प्रदेश ऍस्ट्रोबायोलॉजीसाठी खूप महत्त्वाचा आहे.

अटाकामामधल्या पावसाने काय घडलं या संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष अलीकडेच या ऍस्ट्रोबायोलॉजिस्ट्‌सनी जाहीर केले आहेत. अटाकामा वाळवंट रखरखीत असलं तरी तिथे काही मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जीव तग धरून असतात. नायट्रेट्‌स, सल्फेट्‌स, आणि इतर क्षार तिथे भरपूर प्रमाणावर असल्याने त्यांच्यावर जगणारे सूक्ष्म जीव तिथे कित्येक शतकं राहत आहेत. त्यांनी त्या कोरड्या हवामानाला जुळवून घेतलं होतं आणि आपली अशी एक परिसंस्था उभी केली होती.
पण 2015 मधल्या पहिल्यावहिल्या पावसाने त्यांची ही परिसंस्था पार धुळीला मिळवली! या पावसामुळे कुठेतरी हिरवाई खुलली असेल अशी शास्त्रज्ञांना आशा होती. पण एक गवताची नवी पात दिसणं सोडा, उलट होते त्यातले बहुतांशी सूक्ष्मजीव या पावसाने नष्ट करून टाकले आहेत. शुष्क हवेला सरावलेल्या त्या जीवांना हवेतला ओलावा बिलकुल सहन झाला नाही. तिथलं जवळजवळ 85% सूक्ष्मजीवन नष्ट झालेलं असावं असा या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे तिथे पाऊस जीवनदायी ठरण्याऐवजी जीवघेणा ठरला आहे.

ही बातमी केवळ अटाकामासाठी दुर्दैवी नाही, तर तिचा थेट संबंध अवकाशाशी आहे. मंगळावरही असाच अटाकामासारखा रखरखाट आहे. मंगळावर सजीव नामशेष झाले ते अशाच काही कारणाने का? मंगळावर आधी पाण्याचा साठा होता. हळूहळू तो कमी होत गेला, वातावरण विरळ होत गेलं आणि तिथले सजीव नामशेष झाले, ही सर्वसाधारण मीमांसा केली जाते. मात्र तिथलं जीवन पूर्णपणे नष्ट होण्यामागे अटाकामासारखं काही कारण असेल का? सजीवांच्या काही प्रजाती पाण्याशिवाय जगत असताना अचानक पाण्याचं प्रमाण वाढून त्या नष्ट झाल्या असतील का? अटाकामातल्या पावसाने असे अनेक वैज्ञानिक प्रश्‍न उभे केलेले आहेत. त्यामुळे अटाकामामधला पाऊस हा पृथ्वीवर पडला असला तरी त्याने अवकाश संशोधनाला नवी दिशा दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)