विज्ञानयोगी भारतरत्न सी.एन.आर.राव

2013 मध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर सोबत सी.एन.आर.राव यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला तेव्हा कुठे सर्वांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती समजली. सी.व्ही.रमण आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न मिळालेले ते तिसरे वैज्ञानिक आहेत.

सी.एन.आर. राव यांचा जन्म 30 जून 1934 मध्ये बेंगलोर येथे झाला. आई वडिलांकडून त्यांना लहानपणी साहित्य, इंग्रजी आणि गणित या विषयांची शिकवण मिळाली. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढील संशोधनासाठी त्यांनी अमेरिकेला जाण्याचे ठरविले. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातून त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी पीएच.डी. पूर्ण केली. पीएच.डी पूर्ण होईपर्यंत त्यांचे 28 शोधनिबंध प्रकाशित झालेले होते. अमेरिकेमध्ये खूप चांगल्या संधी चालून आलेल्या असतानाही त्यांनी आपल्या देशामध्ये जाऊन काम करायचे ठरविले. आयआयटी कानपूर येथील रसायनशास्त्र विभागातून त्यांनी आपल्या कार्याला सुरूवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रा.सी.एन.आर.राव हे सॉलिड स्टेट आणि मटेरियल केमिस्ट्री मधील जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आहेत. आजपर्यंत त्यांचे 1600 पेक्षा अधिक शोधनिबंध आणि 51 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. विशेषतः त्यांनी एकाही शोध निबंधाचे पेटंट आपल्या नावावर घेतलेले नाही. त्यांनी लावलेले सगळे शोध सर्वांसाठी खुले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत जगातील साठ पेक्षा अधिक विद्यापीठांनी मानद डॉक्‍टरेट पदवी दिलेली आहे.

प्रा.सी.एन.आर. राव यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. जगातील केवळ नोबेल पुरस्कार सोडला तर विज्ञान क्षेत्रामध्ये असलेले सर्व जागतिक पुरस्कार प्रा.राव यांना मिळालेले आहेत.

ग्रामीण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्वान, सर्जनशील आणि नावीन्याचा शोध घेणारे कित्येक आईन्स्टाईन आपल्याला मिळतील केवळ तिथे जाऊन काम करण्याची गरज आहे, असे म्हणत प्रा.राव दरवर्षी देशभरातील अत्यंत दुर्गम भागात जाऊन विद्यार्थांना शिकविण्याचे काम करतात. आपल्या आयुष्यातील अर्धी कमाई त्यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी खर्च केलेली आहे. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर सरकारने जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. आपण शिक्षणावर जीडीपीच्या केवळ दोन टक्के खर्च करतो, तो वाढला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी महत्वपूर्ण धोरणांची निर्मिती केलेली आहे.

देशामध्ये आयआयटी आणि आयआयएम यांच्यासारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची निर्मिती झाली पाहिजे म्हणून त्यांनी आयसर सारख्या दर्जात्मक संस्थांची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे ती यशस्वी झाली. आज देशभरामध्ये आयसरच्या माध्यमातून दर्जात्मक संशोधन होत आहे. जगभरातील 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकही विद्यापीठ नाही याबद्दल प्रा.राव खंत व्यक्‍त करतात.

वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतरही प्रा.सी.एन.आर.राव आजही प्रचंड ऊर्जेने संशोधनाचे काम करतात. ऑक्‍सफर्ड आणि केमरिज विद्यापीठांमध्ये राव अतिथी व्याख्याता म्हणून शिकवायला जातात. तरूणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, या देशात मी कसे काम करू, कोण मला मदत करेल असा विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करावा. तुम्ही सातत्यपूर्ण काम करीत राहा, तुम्हाला मार्ग मिळेल आणि मदत करणारी माणसेही भेटत जातील, असे प्रा.सी.एन.आर.राव नेहमी सांगत असतात.

– श्रीकांत येरूळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)