विज्ञानप्रेमींनी अनुभवली समुद्रातील सफर

सायन्स गप्पांमध्ये डॉ. रजनी पंचांग यांनी उलगडले समुद्रशास्त्र

पुणे – लाटा कशा निर्माण होतात, समुद्रतळाशी नेमके काय असते, तेथे जीवसृष्टी आणि ऑक्‍सिजन असतो का, समुद्ररचना कशी बदलत गेली, मान्सूनवर समुद्रातील हालचालींचा कसा प्रभाव पडतो, पॅसिफिक, हिंद आणि अटलांटिक महासागराची निर्मिती कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उकल समजावून घेत विज्ञानप्रेमींनी समुद्रातील सफर शुक्रवारी अनुभवली.

मराठी विज्ञान परिषद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक ऍन्ड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या विद्यमाने सायन्स गप्पा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “आयसर’ येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्यांशी समुद्रशास्त्र विषयावर कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात वैज्ञानिक गप्पा रंगल्या. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, आयसरच्या डॉ. अपूर्वा बर्वे उपस्थित होते.

डॉ. रजनी पंचांग म्हणाल्या, समुद्रशास्त्र ही सतत बदलणारी एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. बदलत्या काळानुसार त्याची रचना बदलत राहते. समुद्रातील हालचालींचा परिणाम आपल्या सर्वांवर होत असतो. हा परिणाम नेमका काय आणि कसा होतो, हे अभ्यासण्यासाठी आपल्याला भूतकाळातील घडामोडी अभ्यासाव्या लागतात. बाष्पीभवनामुळे महाकाय समुद्र तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे. पावसाचे अंदाज योग्यरीत्या व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचे विश्‍लेषण करावे लागेल. शंख, शिंपले, मासे, प्रवाळ आणि इतर अनेक प्रजातींच्या अभ्यासातून समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास करता येतो. प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, “विज्ञानातील विविध रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न मराठी विज्ञान परिषद सातत्याने करीत असते. येणाऱ्या पिढिला विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्या क्षेत्रातील करिअरच्या संधी माहिती व्हाव्यात याचाही प्रयत्न आहे. डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)