विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा रेल्वेवर दणदणीत विजय 

बंगळुरू: गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरी आणि आघाडीवीरांनी दिलेली दमदार सलामी यामुळे रेल्वेचा दणदणीत पराभव करताना महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. या स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग चौथा विजय ठरला.
चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारणाऱ्या रेल्वे संघाचा डाव महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी 48.2 षटकांत सर्वबाद 180 धावांवर गुंडाळून आपल्या संघाला वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि जय पांडे या आघाडीवीरांच्या मजबूत सलामी भागीदारीमुळे महाराष्ट्राने 41.2 षटकांत 3 बाद 186 धावा फटकावताना एकतर्फी विजयाची नोंद केली.
ऋतुराज गायकवाडने जय पांडेच्या साथीत महाराष्ट्राला 20.1 षटकांत 88 धावांची सलामी दिली. पांडेने 59 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 38 धावांची खेळी केली. अविनाश यादवने जय पांडेला बाद करीत ही जोडी फोडली. मात्र ऋतुराजने मंदार भंडारीच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 10.1 षटकांत 52 धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राची आगेकूच कायम राखली.
अविनाश यादवने ऋतुराजलाही बाद करीत रेल्वेला दुसरे यश मिळवून दिले. ऋतुराजने 93 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकारासह 84 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर मंदार भंडारीने 1 षटकारासह 29 धावा करताना अंकित बावणेच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भर घातली. विजयासाठी केवळ 10 धावांची गरज असताना मंदार बाद झाला. परंतु अंकितने काझीच्या (नाबाद 9) साथीत महाराष्ट्राचा विजय साकार केला. अंकितने 2 चौकारांसह नाबाद 21 धावा केल्या.
त्याआधी महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी रेल्वेची 4 बाद 23 अशी घसरगुंडी घडवून आणली होती. परंतु मृणाल देवधरने प्रशांत अवस्थीच्या साथीत पाचव्या विकेटसाटी 15 षटकांत 71 धावांची भागीदारी करीत रेल्वेचा डाव सावरला. मृणालने 94 चेंडूंत 8 चौकारांसह 64 धावा फटकावल्या. तर प्रशांतने एका चौकारासह 25 धावा करून त्याला साथ दिली.
हे दोघे परतल्यावर मनीष रावने (28) आशिष यादवच्या (30) साथीत 35 धावांची आणि अविनाश यादवच्या (9) साथीत 27 धावांची भागीदारी करताना रेल्वेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. महाराष्ट्राकडून अनुपम सांकलेचाने 18 धावांत 2 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. समद फल्लाहने 33 धावांत 2, शमशुझामा काझीने 33 धावांत 2, तर सत्यजित बच्छावने 38 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक-
रेल्वे- 48.2 षटकांत सर्वबाद 180 (मृणाल देवधर 64, आशिष यादव 30, मनीष राव 28, प्रशांत अवस्थी 25, अनुपम सांकलेचा 18-2, समद फल्लाह 33-2, शमशुझामा काझी 33-2, सत्यजित बच्छाव 38-2) पराभूत विरुद्ध महाराष्ट्र- 41.2 षटकांत 3 बाद 186 (ऋतुराज गायकवाड 84, जय पांडे 38, मंदार भंडारी 29, अविनाश यादव 39-2, चंद्रकांत साकुरे 33-1).
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)