विजय रणस्तंभसमोर लाखो भीमसैनिक “नतमस्तक’

कोरेगाव भीमा येथे अलोट गर्दी : “जय भीम’चा नारा दुमदुमला


के. डी. गव्हाणे / शेरखान शेख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव भीमा – नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील विजयरणस्तंभ येथे राज्यभरातून विविध पक्ष, संघटना, संस्था, दलित बांधव, आंबेडकर चळवळीतील लाखों कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. यावेळी विजय रणस्तंभ परिसरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. सजावट अखेरच्या टोकापर्यंत असल्याने स्तंभाचे सुंदर विलोभनीय दृश्‍य नागरिक डोळ्यात साठवत होते. काही भीमसैनिक मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. रात्री 12 वाजता कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना झाली. त्यानंतर अभिवादन कार्यक्रमास सुरुवात झाली.

रात्री बारापासूनच गर्दीला प्रारंभ झाला. सकाळी सहानंतर गर्दी वाढू लागली. सकाळी 9 वाजता रिटायर्ड महार रेजिमेंटच्या 100 जवानांनी विजयरण स्तंभसमोर सलामी दिली. भारतीय बौद्ध महासभेप्रणीत समता सैनिक दलाच्या 500 सैनिकांनी संचलन करून सलामी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी सलामी स्वीकारून मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्यभरातून आलेल्या विविध पक्ष, संघटना, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी पहाटे चार वाजता पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराव आंबेडकर, पिपल्स पार्टीचे राष्टीय अध्यक्ष प्रा. जोगेद्र कवाडे, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष विवेक चव्हाण, खासदार अमर साबळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, भीमशक्‍ती युवा सेना अध्यक्ष विलास इंगळे, विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळे आदींनी स्वतंत्र येऊन अभिवादन केले.

गतवर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव, प्रांताधिकारी ज्योती कदम, विभागीय पोलीस अधिकारी विलास गरुड, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी अधिकारी ठाण मांडून होते.

यावेळी कोरेगाव भीमा परिसरात पोलीस दलाकडून प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रवेशद्वारापासून जाण्या येणाचे रस्ते वेगळे होते. दोन ते तीन लाइनमध्ये बॅरिगेटस लाऊन शिस्तबद्ध नियोजन केले होते. नागरिकांना शिस्तीने येऊन अभिवादन करता यावे, याची काळजी घेण्यात येत होती.

लोणीकंदपासून कोरेगाव भीमाला जाणारा मार्ग फक्‍त येणाऱ्या नागरिकांसाठी खुला होता. तरीही दुपारी बारानंतर गर्दी ओसंडून वाहू लागली. यावेळी प्रचंड गर्दी वाढली होती. विजय रणस्तंभाकडे जाण्याची बारी खचाखच भरली होती. यावेळी ढकलाढकली आरडाओरड वाढला होता. पण तरीही शांततेत लाईन पुढे सरकत होती. अभिवादन करुन नागरिक समाधानाने बाहेर पडत होते.

समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, सचिन कडलक, भाऊसाहेब भालेराव, राजाभाऊ सोनकांबळे, बाळासाहेब भालेराव, विशाल सोनवणे, भानुदास भालेराव, संतोष पटेकरी, दिंपकर इंगोले, राजू विटेकर यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले.

पोलीस यंत्रणा तोकडी पडली
कोरेगाव भीमा येथील विजयरण स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखों भीमसैनिक दरवर्षी येतात. त्यातच गेल्या वर्षी उसळलेल्या दंगलीमुळे कोरेगाव भीमा या ऐतिहासिक मानवंदना सोहळ्यास गालबोट लागलेंकोरेगाव भीमाचे नाव पोहचले होते. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलाने गेल्या तीन महिन्यांपासून या ऐतिहासिक मानवंदनेच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन, सुविधांसाठी बैठक घेतल्या होत्या.

पोलीस बंदोबस्त, संचलन, तालुक्‍यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, ग्रामस्थांशी संवाद आदी माध्यमातून नियोजन आणि उपाययोजना केल्या होत्या. यंदा मानवंदनासाठी प्रचंड गर्दी होणार, या दृष्टीने दहापट पोलीस बंदोबस्त, पोलिसांची अतिरिक्‍त कुमक, जादा बसेसची सोय करण्यात आली होती. मात्र, गर्दीचा उच्चांक झाल्यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागले. परंतु पोलीस प्रशासनाची ही यंत्रणा तोकडी पडली. तुळापूर फाटाजवळ पुण्याच्या बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. लोणीकंद माथ्यावर हेच चित्र काही काळ अनुभवयास मिळाले. यावेळी गावागावांतील शांतीदूतची नेमणूक करण्यात आली होती. सुमारे एक हजार शांतीदूत असतानाही पोलिसांची यंत्रणा अपुरी पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)