विजयी “चौकार’ रोखण्यासाठी राष्ट्रवादी “गुगली’ टाकणार?

शिरूर लोकसभा मतदारसंघ विश्‍लेषण

श्रीकृष्ण पादिर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे-राज्यात भाजपने एक पाऊल मागे घेत जुना मित्र शिवसेनेशी “हातमिळवणी’ करीत युती टिकवण्यात यश मिळवले. युती झाल्याने विद्यमान खासदारांना पुन्हा विजयाची खात्री वाटू लागली आहे. जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयाचा “चौकार’ मारण्याच्या तयारीत आहेत; परंतु राजकारणात मुरब्बी असलेले राष्ट्रवादीचे “कर्णधार’ (सर्वेसर्वा) शरद पवार यांच्या “गुगली’ चेंडूवर त्यांची विकेट जाणार की, त्यांनी दिलेला “खेळाडू’ (उमेदवार) आढळराव पाटलांचा चौकार रोखणार, हे येत्या दोन महिन्यांत समोर येणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार आढळराव पाटील यांची उमेदवारी नक्की आहे. अर्थात युती घडवून आणण्यात आढळराव पाटील यांचा “मोलाचा वाटा’ राहिल्याचे परवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवले. दुसरीकडे आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून त्यांना “एकदाही’ जिंकता आलेला नाही. या मतदारसंघात कॉंग्रेस – राष्ट्रवादीची भक्कम “ताकद’ असताना त्यांचा उमेदवार वारंवार पराभूत होणे ही “सल’ शरद पवारांपासून पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील आहे. 2004मध्ये पक्षाने त्यावेळचे खासदार अशोक मोहोळ यांची उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र मौनी खासदार, कोणालाही माहित नसलेला खासदार असा प्रचार करीत या मतदारसंघात “नवा चेहरा’ (आढळराव पाटील) घेऊन शिवसेनेला पहिल्यांदा येथे आपला खासदार निवडून आणता आला. खरे तर हाही “चेहरा’ पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच! त्यामुळे मतदारसंघाची पूर्ण माहिती करून घेत कामे कशी करायची, लोकांपर्यंत कसे पोहाचायचे, चर्चेत कसे राहायचे याचे “राजकीय बाळकडू’ त्यांना राष्ट्रवादीच्या “मुशीत’च मिळाले. अन्‌ त्याचा फायदा त्यांना पुढे 2009 व 2014च्या निवडणुकीत झाला.
याउलट राष्ट्रवादीच्या “पराभूत’ उमेदवाराचे खच्चीकरण झाले. त्याला ताकद मिळाली नाही. प्रत्येक तालुक्‍यातील “नेता’ आपले गट सांभाळत राहिला. पक्षश्रेष्ठींच्याही ही “चूक’ लक्षात आली; मात्र त्यांनीही चुकांवर “पांघरुण’ घालण्यापलीकडे काहीही केले नाही. खासदारकीच्या निवडणुकीत पूर्ण ताकद या पक्षाने कधी आजमावलीच नाही. अर्थात शिवसेनेच्या खासदारांच्या कामगिरीकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. त्यांचा असलेला जनसंपर्क, काम करण्याची पद्धती. मतदारसंघात गावागावांना भेटी देणे. निधी किती दिला? यापेक्षा खासदार माझ्या गावात आला, माझ्याशी बोलला हेही लोकांना, मतदारांना “अप्रूप’ वाटू लागले. येथे खासदारांना भेटायला कोणा मध्यस्थीची गरज भासत नाही. “मी कोणत्याही पक्षाचा असलो तरी खासदार माझा शब्द टाळणार नाहीत’, ही जनमाणसांत, कार्यकर्त्यांमध्ये असलेली भावना शिवसेनेच्या खासदारांना “पूरक’ ठरलेली आहे.
याआधीही या मतदारसंघाने कॉंग्रेसला डावलून अन्य पक्षाच्या उमेदवाराला संधी दिल्याचे इतिहास सांगतो. मात्र यापूर्वीचे खासदार निवडून गेल्यानंतर जनतेच्या संपर्कात येत नसत. मात्र खासदारांना किती निधी मिळतो, हे जनतेला आढळरावांनी पटवून दिले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत संसदेत सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारे खासदार म्हणून लौकिक, 2014च्या निवडणुकीत बैलगाडा शर्यत व खेडमधील विमानतळाचा प्रश्न अशा प्रकारची रणनीती आखून निवडणुकीला ते सामोरे गेले. 2014च्या निवडणुकीत सांगण्यात आले की पुणे-नाशिक रेल्वेचा सर्वे झाला. 2018ला रेल्वे प्रकल्प गुंडाळल्याचे काहींनी सांगितले. मध्येच हायस्पीड रेल्वेला मंजूरी म्हणून 18 डिसेंबर 2018ला हे वृत्त प्रसिद्ध झाले. पुणे-नाशिक ही भारतातील पहिलीच हायस्पीड रेल्वे ठरणार आहे, असेही सांगण्यात आले; प्रत्यक्षात रेल्वेबाबत चर्चा अनेक झाल्या. जेव्हा धावेल तेव्हाच रेल्वे आली, असे म्हणायचे अशी मतदारांमध्ये तरी चर्चा आहे. विमानतळाबाबत खासदारांना विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर पुरंदर येथील विमानतळाचे “टेकऑफ’ होण्यापूर्वीचे “हायस्पीड’ रेल्वे धावणार असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

  • राष्ट्रवादीचे काय चुकले?
    लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघात पूर्णपणे दुर्लक्ष केले. या मतदारसंघात नेते जास्त असले तरी त्यांची ताकद आपापल्या विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहे. या नेत्यांना केंद्रिय सत्ताकारणापेक्षा राज्यातच अधिक रस असल्याने त्यांनी विधानसभेपुरतीच “पकड’ मजबूत केली. कोणत्याही नेत्याने लोकसभा निवडणूक आपण लढावी असा विचार केला नाही अन्‌ पक्षश्रेष्ठींनीही ती पेरणी केली नाही. पाच वर्षांत केवळ भाषणे दिली गेली. अनेक नेत्यांनी सांगितले की, “पक्षाचा उमेदवार कोणीही असूद्या आम्ही त्याचा विजयी करणारच’; परंतु लढायला मात्र कोणी मातब्बर उमेदवार पुढे येण्यास “धजावला’ नाही. नव्हे तर त्यादृष्टीने पाच वर्षांत प्रयत्नदेखील केले नाहीत. 2009 व 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकींचा विचार करता त्या-त्या पाच वर्षांत ना स्वतःहून कोणता नेता पुढे आला, ना पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला. निवडणूक तोंडावर आली तरी उमेदवार जाहीर न करणे विद्यमान खासदारांच्या पथ्यावर पडत गेले आणि त्यांचा “विजयाचा वारू’ आणखीनच ताकदीने पुढे “दौडत’ राहिला. आता 2019मध्येही परिस्थिती वेगळी नाही. निवडणूक म्हटले की, हार-जीत असतेच; पण हार होणारच आहे, हे गृहीत धरून निवडणुकीलाच सामोरे जाऊ नये, हे पचनी पडण्यासारखे नाही. नावाला द्यायचा म्हणून उमेदवार द्यायचा, त्याचा “बळीचा बकरा’ करायचा यामुळे कार्यकर्त्यांचेही “खच्चीकरण’ झाले आहे. पाच वर्षे तयारी करणे, आधीच उमेदवार ठरवणे हे शक्‍य झाले तर हा मतदारसंघ “सर’ करणे राष्ट्रवादीला नक्कीच अवघड नाही.
  • मतभेद असले तरी मनभेद टाळणार
    शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप आपला अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. सक्षम उमेदवार शोधणे हीच राष्ट्रवादीची मोठी समस्या आहे. तरीही माजी आमदार विलास लांडे यांनी “पराभवाचे उट्टे’ काढण्यासाठी व चौकार रोखण्यासाठी जोरदार “फिल्डिंग’ लावली आहे. शिरूरचे मंगलदास बांदल यांनीदेखील निवडणूक रिंगणात “उडी’ घेतली असली तरी विलास लांडे यांनी आता सर्वांशी “जमवून’ घेण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे बांदलांचा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. याशिवाय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासोबतच्या नातेसंबंधानाही पुन्हा “उजाळा’ मिळाला आहे. मतभेद असले तरी “मनभेद’ होणार नाहीत, झालेले दूर व्हावेत यासाठी लांडे “जीवाचे रान’ करताना दिसतात. सहाही विधानसभा मतदारसंघात नेत्यांसह कार्यकर्त्यांशी “संबंध’ वाढविण्याचे काम सुरू आहे. 2009मधील “चुका’ कशा टाळता येतील याचाही “अभ्यास’ त्यांनी केला आहे. मतदारसंघात त्यांनी लावलेले फ्लेक्‍स (बॅनर) मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.
  • विजय-पराभवातील अंतर वाढले
    2004मध्ये मत्कालीन खेड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी खासदार अशोकराव मोहोळ यांचा सरळ लढतीत 20 हजार 810 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर नव्याने फेररचना झालेल्या शिरूर मतदांरसंघात 2009च्या लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव पाटील यांनी माजी आमदार विलास लांडे यांचा 1 लाख 87 हजार मतांनी पराभव केला. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांचा आढळराव पाटील यांनी 3 लाख 1 हजार 423 मतांनी पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)