विजयातून विजयाकडे ही शिवाजी महाराजांची युद्धतीनी

अनंत जोशी ः ओघवत्या वाणीतून उलगडली शिवरायांची शौर्यगाथा
नगर – सेनापती व सैनिकाचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. विजयातून विजयाकडे ही त्यांची युद्धतीनी होती. लढाईच्या वेळी सैन्याच्या अग्रस्थानी राहण्याचे धाडस दाखवत धोका पत्करणारे शिवाजी महाराज उत्तम सेनापती होते. सामान्य माणसातून असामान्य सेनापती निर्माण करणे हे त्यांच्या युद्धतंत्राचे वैशिष्ट्‌य होते असे प्रतिपादन सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत जोशी यांनी केले.
लोकमान्य टिळक सभागृहात सुरु असलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत जोशी यांनी छत्रपती शिवरायांची युद्धनीती या या विषयावर दुसरे पुष्प गुंफले यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, अजित रेखी, सहकार्यवाह उदय काळे, संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी उपस्थित होत्या.
जोशी म्हणाले कि, 17 व्या शतकात आरमाराची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे पहिले द्रष्टे नेते होते. हेर खाते, कोशबळ व युद्धाचा मेळ, शत्रूला कायम अनुकूल ठिकाणी आणणे, सत्रसमय ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची वैशिष्ट्‌ये होती. संपूर्ण शिवशाहीत अधिकची करआकरणी कधीच झाली नाही. आपल्या सैन्यामध्ये जाणीवपूर्वक आत्माहूती निर्माण करणारे बलिदानाची प्रेरणा निर्माण करणारे शिवाजी महाराज हे एक अद्‌भूत रसायन होते. शिवा काशीद, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, ही शिवाजी महाराजांच्या काळातील बलिदाने आहेत. ही बलिदाने शोकांतिका नव्हे तर विजयाच्या गाथा आहेत. घोडदळाच्या अत्यंत आक्रमक, वेगवान हालचाली, आकस्मिकता, लवचिकपणा, चपळता ही त्यांच्या युद्धतंत्राची वैशिष्ट्‌ये होती. म्हणून ऍलेक्‍झांडर, नेपोलियन यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांचे युद्धयंत्र व युद्धनीती सरस होती.
जोशी म्हणाले कि, लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे हे शिवाजीचे स्वप्न होते. अन्यायाचा नि:पात शीलाचे रक्षण, पापी माणसाला शासन, चारी धामाच्या यात्रा सुखरुप पार पडाव्यात, ज्याला त्याला आपापल्या देवाची उपासना करता यावी शेतातील धान्याच्या कणसाला धक्का लागू देणार नाही, माय बहिणींची कंकण अखंड किणकिणीत रहावीत हा लोककल्याणकारी राज्याचा अजेंडा होता. शिवाजी महाराजांची युद्धतीनी कालसुसंगत होती. त्यांच्याकडून नव्या पिढीला नवी प्रेरणा मिळते. आजही कारगीलच्या युद्धात शिवछत्रपतींच्या नावाने घोषणा दिल्या गेल्या. सदा सावध असणारा, आपली संपर्क रेषा कायम अबाधित ठेवणारा, निष्कलंक चारित्र्याचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. सामान्य माणसाच्या महत्वाकांक्षेचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले. शाहिस्ते खानाची बोट छाटणे, अफजल खानाचा वध हा त्याकळी सर्जिकल स्ट्राईक होता. शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, आजही स्फूरण चढते. शिवाजी महाराजांचे नाव मंत्रासरखे होते. म्हणूनच काळ, साधन, शस्त्रास्त्र बदलली तरी आपली गौरवस्थळे, राष्ट्रीय पुरुष तेच असतात. त्यात शिवाजी महाराजांचे नाव अग्रस्थानी आहे.
प्रास्ताविक प्रा. शिरीष मोडक यांनी केले. सूत्रसंचालन अजित रेखी यांनी केले. आभार शिल्पा रसाळ यांनी मानले. यावेळी डॉ.क्रांतीकला अनभुले, डॉ.एच.के.सोमाणी, प्रसन्नप्रभा मोडक, तसेच वाचनालयाचे संचालक दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, किरण आगरवाल उपस्थित होते.
आज सायं.6 वा. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यांचे बदलता साहित्य प्रवास या विषयावर व उद्या दि.18 रोजी ज्येष्ठ समीक्षक, पत्रकार सुलभाताई तेरणीकर यांचे माझ्या चंदेरी आठवणी या विषयावर व्याख्यान होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)