विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा

पोलीस, जिल्हा प्रशासन सज्ज : अनुचीत प्रकार टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न 

पुणे – 
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यासह देशभरातील लाखो नागरिक उपस्थित राहणार आहे. गतवर्षी याठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी 500 सीसीटीव्ही लावण्यात आले असून 11 ड्रोन आणि 110 व्हिडिओ कॅमेराद्वारे या सर्व कार्यक्रमावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून राखीव पोलिस दलाच्या टीम, होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी पत्रकर परिषदेत दिली. यावेळी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, अभिवादन कार्यक्रमाला दहा लाख नागरिकांचा आकडा लक्षात घेत नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्व नागरिकांना शुद्ध पाणी, गुणवत्तापूर्ण जेवण मिळावे, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्यासाठी 25 रुग्णवाहिका आणि 5 कार्डियाक रुग्णवाहिका आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये 10 टक्के खाटा राखिव ठेवण्यात आल्या आहेत.

20 किमी लांबिचे बॅरिगेट, पाण्याचे 200 टॅंकर, 170 फायर प्रोटेस्ट बलून, 300 स्वच्छतागृहे तसेच अग्निशमनदलाचे 23 बंब, 16 क्रेन, 14 ठिकाणी नवीन लाईट्‌स, 150 पीएमपीएलच्या बसेस, 200 खासगी वाहने आणि 50 दुर्बीण अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंगचा गोंधळ टाळण्यासाठी भीमा कोरेगाव आणि पेरणे परिसरात 11 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी 50 हजार वाहनांच्या पार्किंगची सोय होणार असून 12 ठिकाणी चेकपोस्ट लावून येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

तब्बल पाच हजारांहून अधिक पोलीस
भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये 8 अपर पोलीस अधिक्षक, 31 वरिष्ठ पोलीस निरीक्षक,126 पोलीस निरीक्षक, 360 सहायक पोलीस निरीक्षक्‍ आणि पोलीस उपनिरीक्षक, 5 हजार पोलीस कर्मचारी (महिला व पुरूष), 2 हजार स्वयंसेवक, 12 सीआरपीएफ टीम, 7 घातपातविरोधी पथक टीम तैनात असणार आहे.

असा असेल वाहतूक मार्ग
भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 31 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात येणार आहे. नगरकडून हडपसर पुण्याकडे येणारी वाहने, शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरून हडपसरकडे वळविण्यात आली आहे. तर, पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बायपास येथून नगरकडे वळविण्यात येणार आहे.

 जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक नागरीक, विविध संस्था, संघटनांना विश्‍वासात घेत यंदाच्या अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुले यांच्या दृष्टीने सोयीचे ठरावे, असे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी या परिसरासह येथे येणाऱ्या विविध मार्गांवर मानवी तसेच नैसर्गिक संकट येऊ नये, याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे.
– विश्‍वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)