विचार : एक कप चहा 

अमोल भालेराव 

रविवार सुट्टीचा दिवस. अनू जरा उशिराच उठली. घरातील कामं आटोपू लागली. इकडे सोफ्यावर बसून राघवची बोटं कधी मोबाइलमधील मेसेज वाचण्यात, तर कधी टीव्हीच्या रिमोट वर पडत होती. “अनू, ऐक ना..” “काय हो तुमचं, घरात एवढी कामं पडलीत मला. बरं बोला लवकर.” ” अनु, तुला माहितेय की आपला मेंदू एकाच वेळेस जास्त कामे करू शकतो. आता हेच बघ ना, मी व्हॉट्‌सअप चेक करतोय, टीव्ही पण पाहतोय, मधेच पेपर वाचता वाचता मुलांकडे पण लक्ष देतोय. ” यावर अनू, “बरं मग?’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसा राघव जरासा दबक्‍या आवाजात म्हणाला, ” काही नाही गं, या मेंदूला जरा रिफ्रेश करायचं तर एक कप चहा मिळेल का…? आणि आज जरा थंडी पण जास्तच वाटतेय ना?’ अनू राघवकडे पाहून म्हणाली, “पुरे….कळलं मला. एक कप चहासाठी किती जिवाचा आटापिटा. मला वाटलंच की तुम्हाला चहा हवा असणार.” नंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागली.

सकाळपासून राघवचा हा तिसरा चहा होता. ” अनू, काय मस्त झालाय बघ चहा, तू पण घे ना. ” अनू पण त्याच्याशेजारी बसून चहा घेत, ” राघव, तुला कधीपासून म्हणतेय चहा कमी कर. पण तू ऐकशील तर.” “अगं रोज तर ऐकतोय तुझं.” ” राघव कधी तरी सिरियसली घे रे माझ्या बोलण्याला.” राघवचा तोंडाचा पट्टा चालू झाला. ”

अनू, तुला आठवतंय? कॉलेजमध्ये असताना क्‍लासरूममध्ये कमी आणि कॅंटिनमधेच आपला जास्त वेळ जायचा. तासंतास बसून किती गप्पा रंगायच्या आपल्या. त्या गप्पांना खरी रंगत यायची ती चहाचा एक एक घोट घेतानाच. आणि तसंही तुझ्याबरोबर जास्तीचा वेळ घालविता यावा म्हणून ‘चहा’ तर एक कारण होतं गं. तू तेव्हापासून सांगतेस चहा कमी घेत जा आणि मी आजपर्यंत तुझंच तर ऐकत आलोय, असं म्हणत राघव अनूकडे पाहून हसू लागला. बरं ते जाऊ दे, तुला लग्नाची मागणी घालायला म्हणून मी, माझे आई-बाबा आणि मावशी आलो होतो….. ”

हो आठवतंय. आणि तिथेही तुझ्या मावशीने मला हेच विचारले होते, काय गं अनू चहा येतो ना चांगला करायला? तेव्हाच मी ओळखले होते की तुझ्या घरात सगळेचजण ‘चहावेडे’ आहेत. तुला ना राघव रात्री 3 वाजता जरी उठवून चहा घेणार का? असं विचारलं ना तरी तुला झोपमोड केल्याचा राग नाही येणार, पण उलट, अनु त्यात अद्रक जरा जास्त टाक बरं, हेच म्हणणार तू, माहितेय मला. राघव बोलू लागला, “अनु आपण सुट्टीत मुलांना घेऊन गावी गेलो की किती आनंद होतो सगळ्यांना. शेजारचे देखील किती आपुलकीने बोलावतात आपल्याला. चहा तर एक निमित्त असतं. त्या पाच मिनिटांच्या भेटीतील प्रेमाचा गोडवा खरं तर त्या चहात उतरतो बघ.

एकमेकांच्या कुटुंबांविषयी केलेली विचारपूस किती सुख देऊन जाते त्यावेळेत. खूप खूप दिवसानंतर भेटलेला आपला मित्र जेव्हा चहाचे बिल देताना आपल्या हाताला धरून मागे खेचतो ना, तो क्षण चहापेक्षाही गोड वाटतो बघ. सिलेब्रेशन छोटं असो वा मोठं ऐनवेळी खिशाला परवडणारी एकच गोष्ट, ती म्हणजे चहा. आणि एक हक्क वाटतो गं, चल एक कप चहा तरी सांग, असं म्हणण्यात. ”

कामाचा ताण हलका करायला पाहिजे तो चहा; एखादं आवडतं पुस्तक वाचता वाचता चष्म्यातून बारकाईने त्या शब्दांना न्याहाळण्यासाठी आणि मनसोक्तपणे त्यात रमत बसण्यासाठी सोबतीला हवा असतो तो चहाच; तर कधी रोमॅंटिक गाणं ऐकताना, आपल्या प्रियकराबरोबर मोबाईलवर गोड गोड बोलताना तुमच्या हातात असलेल्या चहाच्या कपाचे ‘कान’ पण तुमचे बोलणे ऐकत असतात बरं….!

राघव बोलतच राहिला आणि अनू त्याच्याकडे पाहून हसतच राहिली. ” राघव ऐक ना, मला आज त्या कॅफे मध्ये घेऊन जाशील जिथे तू मला पहिल्यांदा प्रोपोज केले होतेस ?” राघव अनूचा हात हाती घेत, ” येस मॅडम, आज आपण तिथे मस्तपैकी लंच करू या आणि….” राघव पुढे काही बोलायच्या आतच अनू हसून म्हणाली, ” आणि नंतर एक कप चहा….”

तर असा हा चहा, प्रत्येकाला हवाहवासा, कधीही, कुठेही आणि कितीही वेळा. चहा नको म्हणणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळच. बरं चला, माझ्या ऑफिस समोरच एक चहावाला आहे, त्याचंही नाव अमोलच. मी चहा ऑर्डर करतोय, तुम्ही येताय का ‘एक कप चहा’
घ्यायला….?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)