विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही : शरद पवार

“प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’चे वितरण

कोल्हापूर: “यांचा’ दिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही, अशा काव्यमय शब्दांत ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा गौरव केला. शिक्षण हा सुद्धा प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रयत शिक्षण संस्था हे तर त्यांचे दुसरे घरच आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांची जी तळमळ आहे, त्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात नितांत कृतज्ञता आहे, अशी भावनाही व्यक्‍त केली.

शब्दाशब्दांतून समाजाप्रतीची तळमळच
थोरले मेहुणे असलेले प्रा. पाटील विधीमंडळात विरोधी पक्षनेते तर मी सत्तारुढ पक्षाचा मंत्री, अशी अवस्था होती. मात्र, ते जेव्हा विधीमंडळात बोलण्यास उभे राहात, तेव्हा संपूर्ण विधीमंडळ त्यांचा शब्द न्‌ शब्द कानात साठवून ठेवण्यासाठी उत्सुक असे. त्यांच्या मांडणीमध्ये व्यक्तीगत स्वार्थ कधीही डोकावला नाही. समाजाप्रतीची तळमळच त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत असे. सामान्य माणसाच्या हिताचीच भूमिका त्यांनी सातत्याने घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 1 लाख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पवार यांनी आपल्या भाषणामध्ये प्रा. पाटील यांच्या समग्र जीवनसंघर्षाचा अत्यंत ओघवत्या भाषेत आढावा घेतला. त्यावेळी कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेचा संदर्भ देऊन त्यांच्या जीवन उद्दिष्टाचाच स्तुतीपर वेध घेतला. पवार म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वसामान्यांच्या व्यथा सोडविण्यासाठी कॉंग्रेसची विचारधारा पुरेशी ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातून शंकरराव मोरे, केशवराव जेधे आदी प्रभृतींनी त्या विचारांशी फारकत घेऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यातून साकारलेल्या दाभाडे प्रबंधातून सत्तेतील फोलपण लक्षात आणून दिले. या विचारांचे आकर्षण प्रा. पाटील यांच्या मनात निर्माण झाले. तेव्हापासून आजतागायत त्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी आपले कार्य चालविले आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रा. एन. डी. पाटील यांनी प्राचार्य कणबरकर यांच्याशी असलेल्या आपल्या स्नेहाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. त्याचप्रमाणे या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाप्रती ऋण व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)