विघ्नांवर सत्ता चालवणारा विघ्नराज !!! (गणेश नाममाहात्म्य)

विविध विघ्नांवर ज्याची सत्ता चालते. तो विघ्नराज. विघ्नराजाची कथा… पृथ्वीवरील अभिनंदन नावाचा एक राजा राजधर्माप्रमाणे राज्य करीत होता. त्याचे इन्द्राबरोबर वैर सुरू झाले. इन्द्राचे देवत्व नाहीसे व्हावे यासाठी इन्द्राचा हविर्भाग न ठेवता त्याने एक यज्ञ सुरू केला. ही हकिकत नारदांकडून इन्द्रास कळली. अखिल विश्‍वचालक जो भगवान कालपुरुष याचे यथाविधी आवाहन, स्तवन करून “राजाच्या यज्ञाचा नाश करावा’ अशी प्रार्थना इन्द्राने केली. वरदानबद्ध कालपुरुषाने राजाच्या यज्ञाचा नाश केला. इन्द्राहुतीवाचून यज्ञ करणे हे राजाचे कृत्य शासनयोग्यच होते, पण तो शासनाधिकार इन्द्राचा नव्हे, जगन्नियंत्याचा आहे, हे ध्यानात न घेता इन्द्राने अहंकाराच्या व क्रोधाच्या भरी पडून विश्‍वक्षोभकारक कालाच्या साहाय्याने आपण स्वत:च शासन करण्याचे मनात आणले. अर्थात, विश्‍वनियंत्याच्या अधिकाराचे हे अतिक्रमण इन्द्राच्या व विश्‍वाच्याही नाशास कारणीभूत ठरले. अशा प्रकारे असत्‌ रूपाने प्रवृत्त झालेला तो काल म्हणजेच विघ्नासुर. त्याने नाना प्रकारच्या माया योजून सर्वांनाच कर्मभ्रष्ट केले. तेव्हा धर्म शासनाधिकारी वसिष्ठ वगैरे मुनी ब्रह्मदेवांना शरण गेले. त्या वेळी ब्रह्मदेव म्हणाले, “”पार्श्‍वमुनींनी तप केल्यावरून श्री ब्रह्मणस्पती गणेश सांप्रत त्याचा पुत्र झाला आहे. तोच या विघ्नासुराचा नाश करण्यास समर्थ आहे. त्यालाच शरण जा. त्यानंतर सर्व मंडळी पार्श्‍वांच्या घरी आली. त्यांनी विघ्नासुराचा नाश करण्याविषयी श्रीगणराजप्रभूंची प्रार्थना केली. त्याच्या उन्मत्त प्रवृत्तीचा नाश करून त्याला गणराजप्रभूंनी आपल्या स्वाधीन ठेवले. “माझ्या नावाने युक्त असे नाव आपण धारण करावे,’ अशी प्रार्थना विघ्नासुराने केल्यावरून “विघ्नराज-विघ्नेश्‍वर’ या नावाने गणेशांची विशेष प्रसिद्धी झाली. स्वत:चे विश्‍वनियामकत्व कार्य करण्यासाठीही आज्ञाधारक सेवक म्हणून त्या कार्यावर त्या विघ्नरूपाची स्थापना केली. ज्या सत्कर्मामध्ये आधी गणेशपूजा किंवा स्मरण होणार नाही, त्या सत्कर्मामध्ये आसुरभावाने तेथील सर्व फळ भोगण्याचा अधिकार विघ्नराजाने विघ्नासुराला देऊ केला. “विघ्नराज’ हे नावसुद्धा केवळ सत्तार्थ संकेत – बोधकच समजावे. विघ्न शब्दाचा अर्थ प्रतिबंधसत्ता असा असून, समग्र सत्तावानांची सत्ता कुंठित करून टाकण्याचे सामर्थ्य म्हणून ती विघ्न संज्ञा अन्वर्थक समजावी. त्या विघ्नाचा राजा अर्थात्‌ तसे अकुंठित सामर्थ्य धारण करणारा आणि इतर सर्वांचीच सत्ता कुंठित करून टाकणारा असाच तो विघ्नराज जाणावा. त्याची सत्ता मात्र सर्वदा सर्वत्र अकुंठित ठरली आहे. त्याच्या सत्तेला केव्हाही, कोठेही, कसलाही प्रतिबंध कोणीच करू शकत नाही. विघ्नराज नामधारी श्रीगणराजप्रभू शास्त्रोक्त मार्गाने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांना भुक्ती व मुक्ती देतो. त्यांची सर्व प्रकारची विघ्ने हरण करतो. त्याच्या अभक्तांना नाना प्रकारची विघ्ने देत असतो. विष्णु-शिवादी परमेश्‍वरांच्या भक्तांनाही आपल्या उपास्य देवतांच्या भक्तीपूर्वी गणेशाराधन अवश्‍य करावे लागते, तसे गणेशभक्तांना दुसऱ्या देवांचे आराधन करावे लागत नाही. तोच एकमात्र संपूर्ण अर्थाने भुक्तिमुक्तिप्रदाता “विघ्नराज’ होय. देवांनी प्रतिष्ठापना केलेले असे हे विघ्नराज क्षेत्र विजयपुरी येथे निर्माण झाले. आंध्रमधील ही नगरी आता अस्तित्वात नाही.

– दीपक कांबळे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)