विघ्नहर्त्याचे आगमन

शहर, उपनगरांत घरोघरी उत्साह : भव्य मिरवणुकांनी नेत्र सुखावले

पुणे – पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात गणरायाचे गुरूवारी शानदार आगमन झाले. भगव्या टोप्या, उपरणे आणि पारंपारिक पेहरावात अबालवृद्धांनी गणेशमूर्ती आणण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हा सकाळचा असल्याने घराघरांमध्ये याच वेळेत बाप्पांची विधीवत पूजा करुन स्थापना करण्यात आली. शहरातील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना सकाळच्या वेळात झाली. दुपारनंतर मात्र मंडळाच्या मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. फुलांनी आकर्षक सजविलेल्या रथांमधून गणरायाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका रात्री उशिरापर्यत सुरू होत्या.

पुणे शहरात गणेशोत्सवाला आगळवेगळे महत्व आहे. हा उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. दिमाखदार आणि वैभवशाली परंपरा असणाऱ्या या उत्सवाचा आजचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी साजरा केला. घरातील गणपती असो किंवा सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पांच्या आगमनाची तयारी ही आठ दिवस आधीपासूनच सुरू होते. पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळामध्येच देखावे सादर केले जायचे. पण आता घरगुती गणपतीसाठीसुद्धा अत्यंत आकर्षक देखावे केले जातात. त्यामुळे बाजारपेठांमध्ये तीन ते चार दिवस आधीपासूनच गर्दी होते. यंदा सुद्धा तशीच परिस्थिती होती. अगदी गणरायाच्या आगमनाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा खुल्या होत्या.

ठळक मुद्दे
फुलांच्या आर्कषक रथात व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका
प्रमुख मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सकाळीच
अनेक मंडळांचे देखावे पहिल्या दिवसापासूनच खुले

घरगुती बाप्पांची प्रतिष्ठापना सकाळच्या सत्रात गणरायाच्या स्वागतासाठी गुरूवारी सकाळपासून घाई सुरू होती. विधीवत पूजा करुन गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा यंदासुद्धा कायम होती. घराघरामधून मंत्रोउच्चार सुरू होते. गणेशाच्या पुजेचा मुहूर्त हा दुपारपर्यंत होता. त्यामुळे पहाटेपासूनच घरांमध्ये गणेशाच्या पुजा सुरू होत्या. शहरातील प्रमुख मानाच्या पाचही गणपतीची प्रतिष्ठापना सकाळच्या सुमारास करण्यात आली. नगर प्रदक्षिणा करुन बाप्पाला मंडपात स्थापन करण्यात आले. पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंडळाची प्रतिष्ठापना सकाळी 11.52 तर तांबडी जोगश्‍वरी मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना 12.30 गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना 12.00 तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना 11.30 केसरी वाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणपती प्रतिष्ठापना 1.30 या वेळी करण्यात आली. याशिवाय दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना ही सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी करण्यात आली.

दुपारनंतर मात्र शहरात सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका सुरू झाल्या होत्या. ढोल-ताशांचा गजरात गणरायाच्या मिरवणूका निघाल्या होत्या. शहरातील प्रमुख मंडळानी आज परिसरात मिरवणुका काढून बाप्पाचे स्वागत केले. यावेळी आर्कषक अशा फुलाच्या रथात बाप्पा विराजमान झाले होते. त्याचबरोबर मिरवणूकीच्या अग्रभागी ढोल-ताशांची पथके होती. गणेशोत्सवात सर्वांत महत्त्वाचे आर्कषण असते ते देखाव्यांचे. त्यामुळे अनेक मंडळांनी पहिल्या दिवशीच देखावे खुले केले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने सायंकाळीच देखाव्याचे उद्‌घाटन केले.

हा उत्सव आता दहा दिवस चालणार आहे. यादरम्यान प्रत्येक मंडळांमध्ये विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे उत्सवाची रंगत ही आगामी काळात वाढत जाणार आहे.

पावसाच्या विश्रांतीने तारांबळ टळली
गणरायाच्या स्वागताला दरवर्षी पाऊस हजेरी लावतो. पण, यंदा मात्र पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ टळली. पावसाची विश्रांती कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली. दुपारी थोडे ढग होते, पण पावसाने हजेरी लावली नाही. उलट उन्हाचा चटका थोडा कमी झाला होता. आगामी काळात फारसा पाऊस पडेल, अशी शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)