“विघ्नहर’कडून रुपये 200 प्रमाणे दुसरा हप्ता

ओझर-जुन्नर तालुक्‍यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 2016-17 या हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला प्रतिटन 2550 रुपये ऊसभाव जाहिर केला असून, यापूर्वी ऊस उत्पादकांना कारखान्याने एफआरपी प्रमाणे रुपये 2223.34 अदा केले होते व नुकतेच प्रतिटन रुपये 200 प्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून उर्वरीत पेमेंटही लवकरात लवकर देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. गाळप हंगाम 2016-17 मध्ये सर्वच कारखान्यांना गाळप क्षमतेपेक्षा अत्यंत कमी ऊस उपलब्ध झाला. परिणामी महाराष्ट्रामध्ये फक्त 41 लाख टन एवढेच साखरेचे उत्पादन झाले.
याबाबत बोलताना सत्यशील शेरकर म्हणाले की, अशा परिस्थितीमध्येही विघ्नहर साखर कारखान्याने 6 लाख 55 हजार 930 टन उसाचे गाळप करून 11.50 टक्के साखर उताऱ्याने 7 लाख 56 हजार 80 इतक्‍या साखर पोत्यांचे उत्पादन केले. गाळप हंगाम सन 2016-17साठी विघ्नहर कारखान्याची एफआरपी 2223.34 इतकी होती. ती कारखान्याने कारखाना सुरु असतानाच संपूर्णपणे अदा केलेली आहे. यावर्षी साखरेचे बाजार बऱ्यापैकी असलेने एकरक्कमी एफआरपी देणे अनेक कारखान्यांना शक्‍य झाले आहे. साखरेचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. तथापि, सरकाने 5 लाख मे. टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिल्याने साखरेचे बाजारभाव वाढणे दूरच राहिले. परिणामी बाजारभाव 150 ते 200 रुपये कमी झाले आहेत. यावर्षी गाळप कमी झालेने तुलनेने उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजारभाव मिळाला नाही. यापुढेही मिळेल याबाबत शाश्वती राहीलेली नाही. त्यामुळे शेतकरी अतिशय मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थीतीमध्ये आपल्या कारखान्याने जाहीर केलेल्या भावापैकी 200 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे सभासद व ऊस उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट ः कामगार, वाहतूकदारही खूश
शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी वाहतूकदारांचे फायनल पेमेंटही अदा करण्यात आले आहे. व पुढील गाळप हंगाम 2017-18 चे करार करणेचे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर कामगारांना जानेवारी-2017 पासून 15 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आलेली होती. त्याचा 18 महिन्यांच्या फरकाची 50 टक्के रक्कम कामगारांचे खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)