विखेंच्या छबीतच आम्ही नेते सामावलो ; थोरातांचा विखेंना उपरोधिक टोला

आ.थोरातांचा विखेंना उपरोधिक टोला शहराकडे लक्ष देण्यास तांबे कमी पडले 

नगर – विरोधी पक्षनेते असल्याने राधाकृष्ण विखे यांची छबी उमेदवारांनी प्रचारपत्रकावर छापली आहे. त्याची छबी आली म्हणजे जिल्ह्यातील सर्व नेते, आमदारांची छबी आल्यासारखेच आहे. विखेंच्या छबीमध्ये आम्ही नेते सामावलो असल्याचा उपरोधक टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत विखेंना लगावला.

-Ads-

यावेळी डॉ.सुजय विखे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. डॉ. विखे म्हणाले, केडगावमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर कॉंग्रेसने अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्या संपर्कात मी असल्याने त्यांनी प्रचारपत्रकावर ना. विखेंसह माझा फोटो छापला. परंतू त्या आता दुरुस्ती केली असून आ. थोरात यांचा फोटो घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोनच नेते आहेत. आ.थोरात व ना.विखे. त्यामुळे आ.थोरात यांना डावलण्याचा प्रश्‍न येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. थोरात आज नगरला आले होते. त्यावेळी शहर कॉंग्रेसच्या कार्यालयात आ. थोरात यांची पत्रकार परिषदेत झाली.त्यावेळी डॉ. विखे, डी.एम.कांबळे, दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सभापती अजय फटांगरे आदी उपस्थित होते. यावेळी आ. थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह समविचारी पत्र एकत्र आले आहे. आघाडीच्या माध्यमातून शहरात चांगली विकास कामे झाली आहेत. आताही आघाडीची सत्ता येणार असून ते चांगलाच कारभार करतील, ही खात्री देण्यासाठी आलो आहे.

कॉंग्रेसची शहरात चांगली अवस्था आहे. परंतू विधानसभेनंतर सत्यजित तांबे यांनी शहराकडे कमीच लक्ष दिले, अशी कबुली देवून आ. थोरात म्हणाले, आघाडीचाच आमदार झाला आहे. त्यामुळे आता त्यांना साथ देण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला कमी जागा वाट्याला आल्या आहे. असे नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार असल्याने त्यांच्या वाट्याला जास्त जागा देण्यात आल्या आहेत.

या निवडणुकीची सर्व जबाबदारी डॉ. सुजय विखे यांच्यावर टाकण्यात आली आहे.अर्थात सत्यजित तांबे यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महापालिकेकडे पाहिले जात नाही. त्यातच एकात-एक निवडणूक असते. त्यामुळे राजकीय पक्षांना सर्वच निवडणुकांकडे लक्ष द्यावे लागते. शहरजिल्हाध्यक्षपदाचा दीप चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. पक्षात अशा गोष्टी होत असतात असे सांगून आ. थोरात यांनी या प्रश्‍नाला बगल दिली.

डॉ. विखे लोकसभेचे प्रस्तावित उमेदवार 
डॉ. विखे हे लोकसभेचे प्रस्तावित उमेदवार आहे. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठपातळीवर प्रयत्न होत असून नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला मिळाला यासाठी वरिष्ठपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

जाहीरनामा म्हणजे रद्दी – डॉ. विखे 
कॉंग्रेस व राष्ट्रवादीला जाहिरनाम्याची गरज नाही. भाजपने दिलेला वचननामा हा मागील निवडणुकीतीलच आहे. त्यावेळी दिलेले वचन पूर्ण करता आले नाही. भाजपची महापालिकेत सत्ता होती. त्यांनी काही काम केले नाही. जाहिरनामा म्हणजे उद्याची रद्दी असते. त्यामुळे आघाडीने जाहिरनामा तयार केला नसल्याचे डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. 

दोन कुटुंबांत भांडणे लावू नका 
उमेदवारांच्या प्रचारपत्रकांवर नेत्यांच्या फोटोवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे जिल्ह्यास सर्वश्रृत असलेला आ. थोरात व ना. विखे वाद या पत्रकार परिषदेत दिसून आले. डॉ. सुजय विखे यांनी याबाबत खुलासा केल्यानंतर त्यांनी हात जोडून आता दोन कुटुंबात भांडणे लावू नका अशी विनंती केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)