विक्रेत्यांच्या पोटावर पोलिसांचा पाय

विक्रीसाठी बंदी घालत कारवाईचा बडगा, विक्रीस परवानी देण्याची मागणी
सातारा,  (प्रतिनिधी) – आनेवाडी टोलनाक्‍यावर खाद्यपदार्थ तसेच भाजीपाला विकून कुटुंबाचा उदारनिर्वाह चालविणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांसह युवकांवर भुईंज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. टोलनाक्‍यावरील विक्रीस मज्जाव केल्याने विक्रेत्यांच्या पोटावर पाय देण्याचाच प्रकार पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, शनिवारी भुईंज पोलिसांनी येथील विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत पुन्हा विकताना दिल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेशही दिला आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले. त्यामुळे कित्येत शेतकरी भूमिहीन झाले. अशाच प्रकारची परिस्थिती वाई तालुक्‍यातील विरमाडे आणि जावली तालुक्‍यातील आनेवाडी गावातील शेतकऱ्यांवर आली. मात्र, परिस्थितीपुढे हात न टेकता येथील शेतकऱ्यांनी स्वत:ला सावरत महामार्गावर तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलनाक्‍यावर खाद्यपदार्थ आणि भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. यातून परिसरातील गावांमधील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. टोलनाक्‍याच्या उभारणीपासून याठिकाणी स्थानिकांकडून खाद्यपदार्थ तसेच भाजीपाल्याची विक्री सुरु आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपासून भुईंज पोलिसांनी याठिकाणच्या विक्रेत्यांना विक्रीसाठी मज्जाव घातला आहे. तसेच टोल व्यवस्थापनाने याबाबत आमच्याकडे तशा स्वरुपाची मागणी केली असल्याचे सांगितले आहे. याशिवाय विक्रेत्यांकडून वाहनधारकांशी गैरवर्तन केल्याची सबबदेखील पोलिसांनी पुढे केली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी विक्री सुरु आहे. आजवर विक्रेत्यांकडून वाहनधारकांशी गैरवर्तन केल्याचा कोणताही प्रकार उघडकीस आलेला नाही. किंबहुना तशी कोणतीही रितसर तक्रारदेखील पोलीस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे सध्या सुरु असलेली पोलिसांची कारवाई ही आकसापोटीच सुरु असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रविवारी सकाळीच एका चारचाकी वाहनातील चार मुलींसोबत टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. यावेळी चार पोलीस कर्मचारीही याठिकाणी उभे होते. मात्र त्यांनी तटस्थ भूमिका घेण्यातच धन्यता मानली. या प्रकारामुळे टोल कर्मचाऱ्यांची पाठराखण आणि विक्रेत्यांना सापत्नपणाची वागणूक पोलिसांकडून दिली जात असल्याचेच स्पष्ट होत आहे.

खेड शिवापूर, तासवडेत परवानगी अन्‌ आनेवाडीतच बंदी का?
महामार्गावर असणाऱ्या तासवडे तसेच खेड शिवापूर टोलनाक्‍यावरही स्थानिकांकडून किरकोळ खाद्यपदार्थ तसेच भाजीपाला विकला जातो. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी लादली जात नाही. मग आनेवाडी टोलनाक्‍यावरील विक्रीलाच पोलिसांकडून बंदी का घातली जात आहे? असा प्रश्‍न विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पाठीवर मारा, पोटावर नको!
टोलनाक्‍यावर खाद्यपदार्थ, भाजीपाला विकून कसबसा आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही चालवत आहे. त्यामुळे याठिकाणी आम्हाला विक्रीस बंदी करु नका, अशी मागणी करत पाठीवर मारा पण पोटावर नको, अशी आगतिकताही विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

व्यवस्थापनाच्या हरकतीवरुनच कारवाई
टोलनाक्‍यावरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी टोल व्यवस्थापनाकडूनच केली जात आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. तसेच नियमानुसार वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणीच 100 रुपयांप्रमाणे दंडाची कारवाई केली आहे. या कारवाईत आमचा कोणताही स्वार्थ अथवा द्वेष नाही.
बाळासाहेब भरणे, सपोनि. भुईंज पोलीस स्टेशन

आमची कोणतीही हरकत नाही
विक्रेत्यांच्या बंदीबाबत आम्हाला कोणतीही तक्रार नाही. याशिवाय आम्हीही त्यांच्याकडून भाजीपाला अथवा खाद्यपदार्थ विकत घेत असतो. तसेच कारवाईसाठी आम्ही कोणतीही मागणी अथवा तक्रार केलेली नाही. पोलिसांच्या कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)