कवठे – विकास सेवा सोसायट्यांनी कर्जवाटप व कर्जवसुलीबरोबरच संस्था सक्षमीकरणासाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून संस्थेच्या नफ्यात भरीव वाढ करावी, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या किसनवीर सभागृहात सातारा विभागाच्या नियोजन, विकास व पाठपुरावा सभेत बोलत होते.
बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, उपव्यव्स्थापक एम. डी. पवार, धनाजी घाडगे, संदीप वीर, ए. एस. मोहिते, ए. डी. जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बॅंकेच्या 68 वर्षाच्या बॅंकींग कामकाजात बॅंकेला सतत अ ऑडीट वर्ग मिळत असून यात सर्वच घटकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बॅंक 146 सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून सर्वसामान्यांसाठी तळागाळापर्यंत काम करीत आहे.
बॅंकेच्या नफ्यातील 45 टक्के वाटा हा संस्था व शेतकऱ्यांसाठी देते. सोसायट्यांनी मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज पुरवठा वाढवावा. पॅक्स टू मॅक्स व्यवसाय उभारुन संस्थेच्या उत्पन्नात वाढ करावी. मायक्रो अेटीएम मशीनद्वारे संस्था कार्यक्षेत्रातील लोकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
संचालिका कांचन साळुंखे यांचेही भाषण झाले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी व सचिवांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. सातारा तालुक्यातील 2017-2018 मध्ये संस्था पातळीवर 14 संस्थांनी 100% वसुली केली त्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक विभागीय विकास अधिकारी आनंदराव जाधव यांनी तर सूत्रसंचालन विक्री अधिकारी संभाजी यादव यांनी तर आभार विभागीय विकास अधिकारी अजितकुमार मोहिते यांनी मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा