विकास मंडळाच्या इमारतीविरोधात दावा

अद्याप मनाई नाही; सभासदांच्या ठेवी वर्ग करण्यास विरोध

प्रभात वृत्तसेवा
नगर –नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बॅंकेतील ठेवी विकास मंडळाच्या इमारतीसाठी ऐच्छिक अथवा सक्तीने कापण्याच्या विरोधात विकास मंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी अजून झालेली नसल्याने विकास मंडळाच्या इमारतीच्या बांधकामाला स्थगिती दिलेली नाही.
या बॅंकेची वार्षिक सर्वसाधारणसभा उद्या (रविवारी) आहे. बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी सभासदांच्या ऐच्छिक ठेवीतून विकास मंडळाची इमारत बांधण्यात येणार आहे. 13 कोटी रुपयांच्या या इमारतीसाठी ऐच्छिक ठेवीला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर खिलारी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात साम, दाम, दंड, भेद आदींचा अवलंब करून रोहोकले सभासदांच्या ठेवी वर्ग करण्याचा घाट घालीत आहेत, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. या दाव्यात पूर्वी विकास मंडळ व शिक्षक बॅंकेचे सभासद वेगवेगळे होते; परंतु आता राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून शिक्षक बॅंकेच्या सभासदांना विकास मंडळाचे सभासद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. धर्मादाय आयुक्त तसेच महानगरपालिकेची परवानगी न घेताच नवीन व्यापारी संकुलाचे काम हाती घेण्यात येत असल्याचे या दाव्यात म्हटले आहे. रोहोकले यांनी सभासदांच्या संमतीशिवाय कोणतीही रक्कम घेणार नाही, तसेच एकदम दहा कोटी रुपये जमा केले जाणार नाहीत, तर आवश्‍यकतेप्रमाणे ठेवी घेऊन त्यांच्यावर व्याज देण्यात येणार असल्याचे म्हटले असले, तरी खिलारी यांनी मात्र रोहोकले यांच्यावर दमबाजीचा आरोप केला आहे. आम्हाला कोणी मालक नाही, आमच्या मर्जीप्रमाणे काम करू, कोण आडवे येतो, त्याला पाहून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, शिक्षक समन्वय समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना पत्र दिले आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने पोलीस बंदोबस्त मागविला आहे. या बंदोबस्ताला शिक्षक समन्वय समितीने हरकत घेतली आहे. शिक्षकांना वार्षिक सर्वसाधारण समितीत आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे; परंतु त्यांना तो अधिकार बजावू दिला जात नाही. मागच्या वर्षीच्या सभेत गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेण्याऐवजी दुसऱ्याच सभासदांना ताब्यात घेण्यात आले होते. सभासदांच्या म्हणणे मांडण्याच्या अधिकारावर गदा येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुरुकूलचे नेते संजय कळमकर, बाळासाहेब कदम, सुदर्शन शिंदे, सुनील पवळे, राजेंद्र शिंदें आदींचा त्यात समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)