विकासाला खूप वाव – गौरव अत्तारदे

बिझनेस फोकस
पिंपरी– सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, की आपला देश अजूनही विकसित नव्हे तर विकसनशील देश आहे. विकसित देशात आणि विकसनशील देशांमध्ये मुख्य फरक हा आर्थिक दरीचा असतो. विकसित देशांमध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये फार मोठी आर्थिक दरी नसते. आपल्याकडे याच्या उलट परिस्थिती आहे. ही विदारक परिस्थिती बदलणे खूप गरजेचे आहे. अर्थातच ही परिस्थिती बदलण्याची क्षमता ही आपल्याकडे असल्याने विकासाला खूप वाव आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, हे मत आहे युवा उद्योजक गौरव अत्तारदे यांचे.

गौरव अत्तारदे हे बांधकाम, हॉस्पिटिलिटी अशा कित्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून प्रख्यात आहेत. उद्योग आणि उद्योजक या विषयावर दैनिक “प्रभात’ शी बोलताना अत्तारदे यांनी कित्येक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. अत्तारदे म्हणाले की, विकसनशील देशांना पूर्वी विकास करण्यासाठी बराच काळ लागत असे, परंतु आता जग हे एक ग्लोबल व्हिलेज झाले आहे. पूर्वी डिजिटालायजेशन नव्हते आता इंटरनेटच्या माध्यमामुळे जलद विकास शक्‍य झाला आहे. याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे.

-Ads-

शिक्षण व्यवस्था उद्योजक बनवत नाही
आपल्या देशात सगळ्या प्रकारच्या प्रोफेशन्ससाठी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, परंतु उद्योजक बनवण्यासाठी कोणताही अभ्यासक्रम नाही. आपण फक्‍त प्रबंधक बनवतो, उद्योजक नव्हे. उद्योजक बनण्यासाठी आवश्‍यक असणारे परिश्रम, आर्थिक नियोजन, प्रबंधन, मुलभूत ज्ञान या गोष्टी कशा आत्मसात कराव्या, हे शिकवलेच जात नाही. यासाठी उद्योजक बनणाऱ्या तरुणांनाच अनुभवाचे चटके सहन करावे लागतात. आपल्याकडील शैक्षणिक व्यवस्था, रिसोर्सेस यांचा विचार व्हायला हवा. आज आपल्याकडे उद्योगांमध्ये 25 ते 30 टक्‍के मार्जिन आहे, ते विकसित देशांमध्ये नाही. आपल्याकडे बचत खात्यांवर 8 टक्‍के व्याज दिले जाते. विकसित देशांमध्ये बिझनेस मार्जिन खूप कमी असते आणि बचतीवर व्याज तर अत्यल्प असते. या बाबींचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. चांगले बिझनेस मॉड्युल उभे करून परकीय गुंतवणूक मिळवता आली पाहिजे.

बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक नाही
नोटबंदी आणि जीएसटी या दोन निर्णयांमुळे रियल इस्टेटमधून गुंतवणूकदार कमी झाले आहेत. सुमारे 40 टक्‍के व्यवसाय हा गुंतवणूकदारांचा होता, तो आता संपला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या नव्या व्यावसायिकांनी लोकांची गरज व आवश्‍यकता ओळखूनच आपले प्रकल्प उभारावेत. सध्याच्या तरुणाईची गरज आणि त्या भागातील लोकांची क्रयक्षमता लक्षात घेतलीच पाहिजे, असे न केल्यास समस्यांना तोंड द्यावे लागते.
बांधकामाला उद्योगाचा दर्जा कधी?
इतके वर्ष उलटून गेल्यानंतरही बांधकाम क्षेत्राला अद्याप उद्योगाचा दर्जा मिळाला नाही, यामुळे या क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. उद्योगाचा दर्जा न मिळाल्याने बांधकाम व्यावसायिक ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते, त्यांना महागड्या व्याज दराने प्रोजेक्‍ट लोन घ्यावे लागते. बॅंकाकडे कर्जासाठी उपलब्ध असलेल्या रक्‍कमेतील अतिशय मोजक्‍याच रक्‍कमेचे कर्ज बांधकाम व्यावसायिकांना दिले जाते. याउलट इतर व्यवसायांना मोठ्या प्रमाणात कमी व्याज दरावर उद्योग कर्ज दिली जातात. सध्याची स्थिती पाहिली तर इतर उद्योगांच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रातील मार्जिन खूप जास्त आहे, ही बाब बॅंकाही लक्षात घेत नाहीत. सरकारने बांधकामाला शक्‍य तितक्‍या लवकर उद्योगांचा दर्जा दिला पाहिजे. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास कर्जावर जाणाऱ्या व्याजाची रक्‍कम कमी होईल आणि पर्यायाने लोकांना घरेही स्वस्तात मिळतील.

संकटाची संधी बनवली पाहिजे
गौरव अत्तारदे म्हणतात की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे 40 टक्‍के गुंतवणूकदार निघून गेला म्हणून खचून न जाता, बांधकाम व्यावसायिकांनी संकटांस संधी बनवले पाहिजे. सध्याची परिस्थिती खूपच अनुकूल आहे, याचा फायदा करून घेत ज्यांना राहण्यासाठी घर हवे आहे, अशा लोकांची गरज आणि क्षमता ओळखून उभारलेले प्रकल्प पडून राहत नाहीत. मार्केटच्या थम्बरुलला जाणून घेता आले पाहिजे. यश आणि अपयश आपल्या पाऊलखुणा सोडतात, प्रत्येक क्षेत्रात या पाऊलखुणा असतात. प्रत्येक नवउद्योजकांनी या पाऊलखुणा वाचल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रातील आपला मार्गदर्शक ओळखता आला पाहिजे. आमच्या क्षेत्रात आम्ही शेतकऱ्यापासून तलाठ्यापर्यंत आणि टेक्‍निकलपासून ते सेल्स-मार्केटिंगपर्यंत सर्वांना आपले गुरु मानतो. ही नाती जपून ठेवता आली तर उद्योग-व्यवसायात अडचण येत नाही. गुंतवणूक केवळ कामातच नव्हे तर माणसांमध्ये देखील करावी. विशेषतः कर्मचाऱ्यांचे सुख-दुःख उद्योजकांना माहीत असायलाच हवे. आपण किती कमावतो, कुठे चुकलो हे उघडपणे सांगता आले पाहिजे. आजच्या काळात ग्राहकाला देखील पारदर्शकताच आवडते. उद्योजकाने अहंकार न येऊ देता गवताच्या पात्यासारखे रहावे, कितीही मोठे वादळ आले की खाली वाकून, नमून पुन्हा उभे राहता आले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात नवीन उद्योजकांनी निरीक्षण आणि विश्‍लेषण केलेच पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील बारकावे लक्षात घेतले पाहिजे. आपले सह-उद्योजक काय करत आहेत, हे माहीत असेल तरच तुम्ही ग्राहकाला आवश्‍यक असलेले वेगळे काहीतरी देऊ शकाल.

संक्षिप्त परिचय
गौरव अत्तारदे हे सॉफ्टवेयर इंजीनियर होते, परंतु नोकरीऐवजी त्यांनी व्यवसायाची वाट निवडली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी कंपन्यांसाठी लायझनिंग सर्व्हिस ते देऊ लागले. हे करत असताना त्यांची बांधकाम व्यवसायात रुची वाढली आणि त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. आज ते स्वबळावर यशस्वी ठरलेले उद्योजक म्हणून ओळखले जातात.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)