विकासाभिमुख नेतृत्व : प्राजक्‍त तनपुरे 

पालिकेची सत्ता चांगल्या पद्धतीने सांभाळून प्राजक्त तनपुरेंनी नागरिकांचा विश्वास जिंकला असून, शहरासह राहुरी मतदारसंघाच्या प्रलंबित विकासाला गती देण्याचा विडाच उचलला आहे. शहराच्या विकासाला आकार देताना त्यांनी अनेक विकासकामांचा श्रीगणेशा केला आहे. नगराध्यक्षपद भूषविताना सर्व नगरसेवकांना दिलेली समान वागणूक त्यांच्या भावी राजकारणासाठी उपयुक्त ठरणारी आहे. 

गेल्या 15 वर्षांपासून विकासापासून दूर गेलेल्या राहुरी तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका आणि प्रसाद शुगर कारखान्याच्या माध्यमातून संघर्ष व प्रयत्न करीत असलेले राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे हे त्यांच्या सृजनशील विचार आणि कर्तृत्वशील नेतृत्वामुळे अल्पावधीतच जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन असो, कामगारांचे प्रश्न असो, नागरिकांच्या समस्या असो, व्यापाऱ्यांच्या तक्रारी असो, अथवा महिला आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी असोत, या सर्वांच्या हाकेला धावून जाणारे युवानेते म्हणून आज प्राजक्तदादांचा नावलौकिक झाला आहे. राज्यात बागायती म्हणून मिरविणारा राहुरी तालुका आज विकास कामांच्या बाबतीत पिछाडीवर पडला आहे.

तरूणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांसमोर पाण्याची समस्या आ वासून उभी आहे. कायदा व सुव्यवस्थेचे भान नसलेले प्रशासन, गुंडगिरी, दडपशाही, याबरोबरच विकासाच्या वाहिन्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची लागलेली वाट, शेवटच्या घटका मोजत असलेल्या सहकारी संस्था, निळवंडे कालव्याचा प्रश्न, वांबोरी, भागडा चारीचा प्रश्न, आदीवासी व धरणग्रस्तांचा प्रश्न यासह अनेक समस्यांनी राहुरी तालुका त्रस्त झाला आहे. त्यामुळे विकासाचा आलेख घटला आहे. अशावेळी राहुरी तालुक्‍याला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेणाऱ्या दूरदृष्टी नेतृत्वाच्या शोधात असलेल्या जनतेला प्राजक्त तनपुरेंच्या रूपाने एक नवे नेतृत्व लाभले आहे. या नेतृत्वाकडून आता राहुरी तालुक्‍यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर हारतुरे घेण्यापेक्षा निवडून देणाऱ्या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करणारा नेता म्हणून नगराध्यक्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाची झलक अनेकांनी अनुभवली आहे. नगराध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा परिचय झाला होता. त्यामुळेच राहुरी शहराच्या पालिकेचा एकहाती कारभार जनतेने त्यांच्यावर अतिविश्वासाने सोपविला आहे. पालिकेच्या निवडणुकीत तनपुरे यांचे नेत्रदीपक यश अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे. त्यांचा हा यशाचा रथ रोखण्यासाठी अनेकांनी त्यांना अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा विजयी रथ कोणीही रोखू शकले नाही. हीच त्यांच्या नेतृत्वाची व यशाची खरी पावती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तनपुरेंकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या 
राहुरी तालुक्‍याला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेणाऱ्या दूरदृष्टी नेतृत्वाच्या शोधात असलेल्या जनतेला प्राजक्त तनपुरेंच्या रूपाने एक नवे नेतृत्व लाभले आहे. या नेतृत्वाकडून आता राहुरी तालुक्‍यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर हारतुरे घेण्यापेक्षा निवडून देणाऱ्या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करणारा नेता म्हणून नगराध्यक्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाची झलक अनेकांनी अनुभवली आहे.

राहुरी नगरपालिकेच्या राजकारणात प्राजक्तदादांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांनी राहुरीत प्रचारसभेत हजेरी लावून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला. मात्र, जनता जनार्दनाच्या मनात भरलेल्या प्राजक्तदादांना राहुरीकरांनी भरभरून मतदान करून त्यांच्या हातात एकहाती सत्ता दिल्याने त्यांचे राजकारणातील पहिले पाऊल कमालीचे यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी या सत्तेचा चांगला वापर करून राहुरी शहरात विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे. पालिकेची सत्ता चांगल्या पद्धतीने सांभाळून त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकला असून, शहरासह राहुरी मतदारसंघाच्या प्रलंबित विकासाला गती देण्याचा विडाच उचलला आहे. शहराच्या विकासाला आकार देताना त्यांनी अनेक विकासकामांचा श्रीगणेशा केला आहे.

शहरातील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न उपोषणाचे हत्यार उपसून त्यांनी मार्गी लावला. जे काम राज्यातील सत्ताधारी नेत्यांना जमले नाही, ते काम त्यांनी धसास लावले आहे. तनपुरे यांनी उपोषणाचे हत्यार उपसताच मंत्रालयातून आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयाला निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी ग्रामीण रूग्णालयासाठी केलेला पाठपुरावा विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे. त्यामुळे इमारतीसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रसाद शुगर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी ऊस उत्पादकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून समन्यायी पाणीवाटपात न्यायालयात दिलेला लढा शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरला आहे. सवंग प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता, कोणताही गटतट न बघता केवळ राजकारणातून समाजकारण करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे ठरले आहे.

दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मासरे कुटुंबियांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणाऱ्या तनपुरेंचे आमदार बच्चू कडू यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. राजकारणासाठी व प्रसिद्धीसाठी नव्हे तर सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या तनपुरे यांनी नुकतेच पाथर्डी भागात जाऊन तेथील पीडित मुलीच्या कुटुंबाचे सांत्वन केले. मुलीच्या शिक्षणाचा व आरोग्याचा सर्व खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अनेकांना आला. कुरणवाडी पाणीयोजना तीन वर्षापूर्वी दुष्काळाच्या वेढ्यात सापडली होती. महावितरणचे बिल अदा करण्यास कोणाचीच मदत मिळत नव्हती. अशावेळी प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने प्रसाद शुगरच्या माध्यमातून कुरणवाडी पाणी योजनेला बिनव्याजी 25 लाख रुपये उपलब्ध करून दिल्याने आजही ही योजना चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकारणाची तमा न बाळगता प्राजक्त तनपुरेंनी दिलेली साथ शेतकऱ्यांना लाखमोलाची ठरली. शेतकऱ्यांनी राज्यात बंद पुकारलेला असताना शेतकऱ्यांचा उद्रेक वाढला. राहुरी तालुक्‍यातही जाळपोळीच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या अनेक तरूणांना तुरूंगात टाकले. यावेळी सत्तेत असणाऱ्या एकाही नेत्याने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही व खोटे गुन्हे दाखल झालेल्या तरूणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु, शेतकरीहित हेच सर्वस्व मानणाऱ्या प्राजक्त तनपुरेंनी निरपराध तरूणांना जोपर्यंत न्याय दिला जात नाही, तोपर्यंत अन्नपाणी वर्ज्य करत आमरण उपोषण सुरू केले. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसातही भिजलो तरी चालेल मात्र, उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा घेतल्याने प्रशासनाने तनपुरेंच्या उपोषणाची गंभीरतेने दखल घेतली. शेतकरी आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले गेले. परिणामी, उशिरा का होईना, त्या शेतकरी तरूणांना न्याय मिळाला. न्यायालयाने तरूणांना जामीन देताच संबंधित तरूणांनी व असंख्य शेतकऱ्यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेवून आभार मानले.

अशाप्रकारे युवानेते प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्‍यातील विकासकामाचे ध्येय उराशी बाळगून विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. राहुरी तालुका गत 15 वर्षात सर्वच क्षेत्रात पिछाडीवर गेला असून आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून सर्वसामान्य जनता प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. राहुरी नगरपालिकेचे आरोग्य, पाणी, शिक्षण आदी प्रश्न मार्गी लावताना पंतप्रधान घरकुल योजनेत तनपुरेंनी अल्पावधीत मोठी गरूडझेप घेतली आहे. त्यांच्या कामाचा लेखाजोखा लवकरच राहुरीकरांसमोर उभा राहणार आहे. ग्रामीण रूग्णालयाचे काम लवकरच सुरू व्हावे, म्हणून प्राजक्त तनपुरे यांचा पाठपुरावा सुरूच आहे. राज्य शासनाकडे पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षापासून होत असलेला पाठपुरावा प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात मार्गी लागणार आहे.

तर शहरातील शेकडो कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ मिळत असून शहरातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. नगरपालिका प्रशासनामध्ये सत्ताधारी कोण व विरोधक कोण हे न पाहता केवळ विकास साधायचा आहे, हाच दृष्टीकोन ठेवत नगराध्यक्षपद भूषविताना प्राजक्त तनपुरेंनी सर्व नगरसेवकांना दिलेली समान वागणूक त्यांच्या भावी राजकारणासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

 

 

अशोक मंडलिक 
वार्ताहर, राहुरी विद्यापीठ 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)