विकासाच्या वाटेवर खंडाळा तालुका

खंडाळा तालुका हा सातारा जिल्ह्यातील उत्तरेस असलेला तालुका. भौगोलिक दृष्ट्‌या संमिश्र. कुठे चांगला पाऊस तर कुठं कायमच अवर्षणग्रस्त. एका बाजुला जलाशय लाभलेला तर दुसरीकडे उजाड डोंगररांगा मिरवणारा. इथला भुमिपुत्र अनेक वर्षे दुष्काळ, नापिकीने अभावानेच रोजगाराच्या संधी अशा परिस्थितीत गांजलेला असा होता. अगदी काही दशके पाठीमागे जाऊन पाहिलं तर खंडाळा हा अत्यंत मागासलेला तालुका अशीच काहीशी ओळख असलेला तालुका होता. काही सन्माननीय अपवाद वगळता तालुक्‍याचा विकास करण्यात तत्कालीन नेत्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नव्हते.

गावोगावचा तरूण रोजगाराच्या शोधात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माथाडी कामाला जाऊन पोट भरत होता किंवा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. गावात शेती असूनही पाण्याअभावी ती पडून असायची. बेभरवशी पावसाने कायमच ओढ दिल्याने शेतकरी सधन असणे दुर्मिळ होते. जनावरे पाळावित तर चारा उपलब्ध नसायचा त्यामुळे तोही व्यवसाय निरा नदीवरील व निरा उजव्या कालव्या लगतची गावे वगळता उर्वरित तालुक्‍यात जोम धरू शकला नाही. असा हा स्वातंत्र्यपुर्व कालखंडापासून काहीसा विकासापासून दूर असलेला म्हणून ओळख असलेला तालुका होता.

साधारणतः गेल्या काही दशकात हळूहळू खंडाळा तालुक्‍याने कात टाकायला सुरुवात केली. शिरवळ येथे औद्योगिक वसाहत झाली. हळूहळू नवनवीन कंपन्या आल्याने खंडाळा तालुक्‍याचे अर्थकारण बदलू लागले. निरा नदीकाठावरील हा
परिसर औद्योगिकरनामुळे झपाट्याने बदलत गेला. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्याने स्थानिकांबरोबरच बाहेरच्या लोकांचा लोंढा या परिसरात दाखल झाला.

लोकांच्या हाती काम आल्याने बाजारपेठात उलाढाल वाढू लागली. हळूहळू शिरवळ बरोबरच खंडाळा तालुक्‍याच्या लोणंद शिरवळ पट्ट्यात मोठमोठ्या कंपन्या दाखल झाल्याने तालुक्‍याचा चेहरामोहराच बदलून गेला. हे औद्योगिकरन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने धोम बलकवडीचे पाणी खंडाळा तालुक्‍यातील गावागावात पोहचत होते.

अगदी मुबलक नसलं तरी वर्षानुवर्षे तहानलेला तालुका या पाण्याचा तृप्त ढेकर देऊन हिरवाईने नटून डौलाने डोलू लागला. बघता बघता खंडाळ्याच्या जवळ असलेल्या म्हावशीच्या माळावर साखर कारखाना उभा राहिला. याच काळात शेतकरी खऱ्या अर्थाने शेतीतील सुबत्ता अनुभवतोय (बाजारभावाने दगा दिला नाही तर), याच बरोबर औद्योगिकरणात ज्यांची जमीन गेली त्यातील अनेक शेतकरी भूमीहीन झाले.

जरी शेती हातातून गेली तरी मोबदला म्हणून आलेला अमाप पैसा शेतकऱ्यांला दुसरीकडे व्यवसाय उद्योग करायला उपयोगी पडला. यातील अनेकांनी अचानक आलेल्या पैशाचे योग्य नियोजन करता न आल्याने वाट्टेल तशी उधळपट्टी केली. मोठमोठ्या गाड्या घेतल्या , बंगले बांधले. अशाचे डोळे पैसे संपल्यावरच उघडले. औद्योगिकरणामुळे आणि धोम बलकवडीचे पाणी आल्याने आलेली सुबत्ता आणि दुसऱ्या बाजूला भूमीहीन झालेला शेतकरी, आणि सर्व काही गमावलेले अनेक कुटुंब असा हा खंडाळा तालुक्‍याचा प्रवास खरंच खूप वेगवान असा आहे.

खंडाळा तालुक्‍यातील अनेक प्रश्‍न मार्गी लागत आहेत . तालुक्‍यातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलतेय. तालुक्‍यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या लोणंद येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आगामी काळात लोणंदला जंक्‍शन होण्याची शक्‍यता आहे. यामुळे येथील व्यापारात आणखी वाढ होईल. शेतकऱ्यांच्या मालासाठी पूर्ण देशातील बाजारपेठात माल पाठवण्यासाठी स्वस्त वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. या औद्योगिक पट्ट्यातील भविष्यातील वाढीचा विचार करून येथील सोयी सुविधा आत्ताच वाढवणे आवश्‍यक आहे.

या परिसरात अजूनही अग्नीशमन व्यवस्था पुरेशी नसल्याने औद्योगिक दुर्घटना घडली तर मोठी हानी होऊ शकते. तसेच शिरवळ लोणंद हा रस्ता नावालाच चौपदरीकरन झालेला वाटतो. गेली अनेक वर्षे रखडलेल्या हा रस्ता अवजड वाहनचालकांची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. तर खंडाळा लोणंद रस्ता पुरेसा रुंद नसल्याने मोठ्या वाहतूकीस अयोग्य आहे. या दोन्ही मार्गांचे रस्ते मोठे होणे आवश्‍यक आहे.

याचबरोबर शेतीसाठी मिळत असलेलं पाणी अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. तो प्रश्‍नही लवकर मार्गी लागला गेला पाहिजे. औद्योगिक वसाहतीत होणारी स्थानिकांची गळचेपी हा मुद्दा तर भविष्यात कळीचा मुद्दा होऊ शकतो. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारे तालुक्‍यातील अनेक प्रश्‍न सुटत चालले आहेत तसेच ते भविष्यातील खंडाळा तालुक्‍याचे आव्हान बनून समोर उभे देखील ठाकले आहेत.

– प्रशांत मधुकर ढावरे
   लोणंद प्रतिनिधी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)