विकासाचे कोण बोलणार? (अग्रलेख)

वाढती महागाई आणि दुष्काळाच्या झळांनी बेजार झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी राज्यातील सर्वपक्षीय नेते वाटेल ते बोलून तोंडची वाफ दडवत असल्याचे पाहून या गलिच्छ राजकारणाची कीव आल्याशिवाय राहत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वाक्‌युद्ध याचे ताजे उदाहरण आहे आणि खासदाराची संभावना “बेवडा’ या विशेषणाने करुन प्रणिती शिंदे यांच्यासारख्या महिला नेत्याने हाच पायंडा चालू ठेवला आहे असे दिसते. राजकारण म्हटले की, आरोप प्रत्यारोप आणि वाद प्रतिवाद आले. पण सध्याची आरोप प्रत्यारोपाची पातळी पाहिली तर चाळीतील नळावरील भांडणे परवडली, असे म्हणावे लागते.

एखाद्याने आरोप केला की त्याला प्रत्युत्तर देणे समजण्यासारखे असले तरी हे उत्तर देताना समोरचा दुखावला कसा जाईल यालाच प्राधान्य दिले जात आहे. या गडबडीत प्रमुख आणि महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडत आहेत याचे भानही कोणाला नाही. शिवसेना आणि अजित पवार यांच्यातील वाक्‌युद्धाने तर राजकीय संवादाची सर्व पातळी सोडली आहे. “अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतात, अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही’, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. “काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत’, असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी टीका करताना, “ज्यांना पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?’ असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. अजित पवार यांची टीका ठाकरे यांना झोंबल्याने त्यांनी अजित पवार यांच्या “कुप्रसिद्ध धरणातील पाण्याबाबतच्या विधानाचा’ आधार घेत अतिशय खालच्या पातळीवरील टीका केली. अजित पवार यांना दुखावणे हाच एकमेव हेतू त्यामागे होता हे उघड आहे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या छंदाविषयी टोला लगावला होता. यावरही असंसदीय भाषेत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार आणि ठाकरे यांच्या या संवादाने लोकांचे घटकाभर मनोरंजन झालेही असेल. पण याच काळात विकासाचा मुद्दा संपूर्णपणे दुर्लक्षिला गेला हेही विसरुन चालणार नाही. हा वाद कमी होता म्हणून की काय सोलापूरच्या मातीतही असाच एक फड रंगला. सोलापूरच्या भाजपा खासदारावर टीका करताना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी “बेवडा खासदार’ असा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाही प्रणिती शिंदेंची जीभ घसरली. “आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे. फवारणी करून या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय,’ असं प्रणिती शिंदेंनी म्हटले आहे. सभेत टाळी घेणारे हे वाक्‍य असले तरी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ज्या संयमाने सध्या मोदींवर परखड टीका करीत आहेत, ते पहाता तळागाळापर्यंत ही “टीकासंस्कृती’ पोहोचली नाही की काय असे वाटते.

अर्थात प्रणिती शिंदेंवर प्रत्युत्तराची टीका करताना सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनीही “रेव्ह पार्टी’ वगैरे शब्दांचा वापर करून आपण एका महिलेवर टीका करीत आहोत याचे भान बाळगले नाही. संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळत असताना बनसोडे आणि शिंदे यांच्यातील या अप्रस्तुत वादामुळे कोणाचे भले झाले, याचा खुलासा दोघांनीही करायला हवा. तिकडे साताऱ्यात तेथील खासदार आणि आमदार दारूचे दुकान हटवण्याच्या विषयावरून आमनेसामने आले आहेत आणि यानिमित्ताने एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक सुरू आहे. राज्याच्या राजकारणात वाचाळपणाची साथ आली आहे की काय अशी शंका यावी, अशी ही परिस्थिती आहे. एकीकडे दररोजच्या दूरचित्रवाणीवरील चर्चेच्या गुऱ्हाळात सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते आपल्या अकलेचे तारे तोडत असताना; दुसरीकडे राजकीय नेतेही ताळतंत्र सोडून बोलायला लागले तर काय करायचे? भाजपने काही दिवसापूर्वी पक्षशिस्तीचा भाग म्हणून राम कदम, मधु चव्हाण आणि अवधूत वाघ या प्रवक्‍त्यांचे काम थांबवले होते. पण त्यापूर्वी या तिघांनीही भरपूर बडबड करुन घेतली होती. प्रवक्‍त्यांवर अशी कारवाई होत असेल, तर नेत्यांवर कारवाई का नको, असा प्रश्‍न सामान्य कार्यकर्त्याला पडला तर आश्‍चर्य वाटायला नको. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. अशा विधानांचे परिणाम अनेकांना अजून भोगावे लागत आहेत. तरीही नेत्यांना शहाणपण येत नाही.

सभा गाजवण्याच्या नादात आपण काय बोलतोय याचे भानही राहत नाही आणि नंतर खुलासे करण्याची वेळ येते. लोकसभा निवडणुकीला काही महिने आणि विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी राहिले असताना विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानण्याची ही रणनिती राजकीय पक्षांना अडचणीत आणू शकते. आक्षेपार्ह बोलून सभा गाजवण्यापेक्षा लोकांच्या हिताचे बोलून मतदाराच्या मनात स्थान मिळवण्याची ही वेळ आहे. राजकीय नेत्यांना विकासाच्या मुद्यावर सभा आणि कार्यक्रम गाजवता येत नसतील तर किमान अश्‍लिल आणि आक्षेपार्ह बोलून राजकारणाचा “बी ग्रेड सिनेमा’ करू नये एवढीच अपेक्षा आहे. ती तरी पूर्ण होईल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)