विकासाची गैरसोय

मयूर सोनावणे

सातारा शहराचे नाक असलेल्या पोवईनाका येथे सध्या ग्रेड सेप्रेटरचे काम सुरु आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही नागरिक हे सर्व निमुटपणे सहन करत आहेत. कारण ग्रेडसेप्रेटरमुळे आता अडचण होत असली तरी भविष्यात याचा फायदाच होणार असून शहराच्या लौकिकातदेखील भर पडणार आहे. मात्र, नागरिकांच्या सोशिकतेचा पालिका प्रशासनाकडून गैरफायदा तर घेतला जात नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे.

पालिकेकडून विकासकामांचा डोंगर उभा करण्याचा सुरु असलेला प्रयत्न आता नागरिकांना तापदायक ठरु लागला आहे. पोवईनाक्‍यावरील ग्रेडसेप्रेटरच्या कामाबरोबरच पालिकेने शाहूपुरीतील पुलाच्या कामाचा आणि आता भुयारी गटर योजनेसाठी सुरु केलेले खोदकाम यामुळे शाहूपुरी परिसरातील नागरिक अक्षरश: वैतागून गेले आहेत. मात्र याची तक्रार करायची तरी कुणाकडे? आणि तक्रार केलीच तरी त्याची दखल घेतली जाईल का? हेही महत्वाचेच आहे.

सातारा शहर स्मार्ट करण्याच्या प्रयत्नात एकाचवेळी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय सोडविण्यात पालिकेला धन्यता वाटत नाही. एखादे काम सुरु करण्यापूर्वी त्या कामामुळे गैरसोय होऊ नये यासाठी पर्याय उपलब्ध करणे गरजेचे असते. मात्र, सातारा शहरात सुरु असलेल्या कामांवरुन तसे काही दिसत नाही. या कामांमुळे कुणा एकाची नाही तर नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, व्यावसायिक यासह इतरांचीही गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी ही सर्व कामे सुरुवात करण्याची गरजच काय होती? असा प्रश्‍न नागरिकांना पडू लागला आहे. त्यातही कामे सुरु करुन लवकर उरकण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.

शाहूपुरीतील सुरु केलेल्या पुलाचे काम 90 दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, आजमितीला हे काम अर्ध्यावरही नाही त्यामुळे नागरिकच काय परंतु संबंधित ठेकेदारसुद्धा 90 दिवसात हे काम पूर्ण होईल, असे ठामपणे सांगू शकणार नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. विकासकामे ही जनतेच्या सोयीसाठी असतात, गैरसोयीसाठी नसतात. एखाद्याठिकाणी गैरसोय होऊ शकते आणि ती गैरसोय सहन करण्याची मानसिकताही नागरिक ठेवत असतात.

मात्र, ठेकेदारांचे खिसे गरम करण्यासाठी विकासाच्या गोंडस नावाखाली सुरु केलेली ही कामे म्हणजे नागरिकांना “तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करणे’ अशी वाटू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून उद्रेक होणार नाही आणि हा उद्रेक कशावरुन मतपेटीतून बाहेर पडणार नाही? याची शक्‍यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेला संबंधितांनी दुबळेपणा समजू नये इतकेच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)