विकासकामांमध्ये राजकारण नको

मयूर सोनावणे
केवळ एका शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही अपवाद वगळता खेडोपाड्यात जाणारे रस्तेही पूर्णत: उखडले आहे. असे असताना प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होणे ही खेदाची बाब आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणार रस्ता असो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणारा महामार्ग. अगदी इथून तिथून सगळे रस्ते एकसारखेच झाले आहेत.

महामार्गाचे नव्याने सहापदरीकरण झाल्यामुळे त्याची अवस्था जरा बरी असली तरी अनेकठिकाणी जीवघेणे खड्डे, पावसामुळे रस्त्याकडेला साठलेली माती आहेच. याशिवाय सेवारस्त्यांविषयी तर काही बोलायलाच नको. लाज वाटावी अशी अवस्था सेवारस्त्यांची झाली आहे. रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या आणि या साऱ्यामुळे घडत असलेले अपघात अन्‌ अपघातात निष्पाप जाणारे बळी या घटना आता नित्याची बाब ठरु लागल्या आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बातम्या दररोज येऊ लागल्या आहेत. याला जबाबदार कोण? रस्त्यांची कामे मंजुर करणारे लोकप्रतिनिधी? की रस्ते करणारे ठेकेदार? असे प्रश्‍न सर्वसामान्यांसह सर्वांनाच पडत आहेत. मात्र या प्रश्‍नांची उत्तरे मागायची तरी कुणाला, हा त्याहून भयंकर प्रश्‍न.

या सर्व घटनांमध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या माध्यमातून विकासकामे खेचून आणत आहेत. ज्या ठेकेदारांना ही कामे दिली जातात, हे ठेकेदारही काही या लोकप्रतिनिधींना अनोळखी नसतात. कामे करत असताना अगदी दररोज म्हटलं तरी संबंधित ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी हे एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यापुढे होत असलेल्या कामांची पाहणीदेखील हे लोकप्रतिनिधी करतातच. आणि आता ही कामे दर्जेदार नाहीत म्हणून देखील हे लोकप्रतिनिधींनीच ओरडायच, हे सर्व म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखच आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

जनतेप्रती लोकप्रतिनिधींना खरच तळमळ असेल तर किमान विकासकामांमध्ये तरी राजकारण करु नये, प्रत्येक काम हे दर्जेदार व्हावे, मग ते रस्त्याचे असो अथवा इतर कोणतेही त्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणजे पुन्हा गळा काढण्याची वेळ येणार नाही. याहून जनतेनेही ज्याप्रमाणे आयुष्यातील गरजेच्या वस्तू जशा निरखून घेतल्या जातात, तसेच लोकप्रतिनिधी निवडतानाही पारख ठेवल्यास सर्व काही व्यवस्थित घडेल. दिशाभूल करणाऱ्या, खोटी आश्‍वासने देणाऱ्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय कामे दर्जेदार होणार नाहीत हेदेखील जनतेने लक्षात ठेवले पाहिजे आणि फसणूक करणाऱ्यांना निवडणुकीतच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

तसेच आपण जनतेच्या मतांवर निवडून येत असतो, जनतेची सेवा करणे हे आपले पहिले कर्तव्य असते याची जाण नेत्यांनी ठेवावी आणि जनतेच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी प्रयत्न करावेत. विशेषबाब म्हणजे रस्त्यांसारख्या महत्वपूर्ण कामांबाबत लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून ही कामे दर्जेदार करुन घेतली पाहिजेत. टक्केवारीसाठी त्यात तडजोड करुन नये. कारण याचे भविष्यात होणारे परिणाम हे भयंकर ठरत असतात याची जाणीव ठेवावी. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक बळी गेला तरी त्यामागे त्याचे सर्व कुटुंब उद्‌ध्वस्त होत असते याचादेखील गांभीर्याने
विचार करण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)