विंडीजने थकवले, रोमहर्षक सामना अखेर ‘बरोबरीत’

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट मालिका

विशाखापट्टनम: विराट कोहलीचे आक्रमक शतक आणि अंबाती रायुडूने केलेल्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने आज प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्त इंडीज समोर विजयासाठी 322 धावांचे ‘विराट’ आव्हान ठेवले होते. भारताच्या या विराट आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची दमछाक होईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र विंडीजकडून ‘होप’ने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना लढवत अखेर भारताला सामना बरोबरीवर सोडवण्यास भाग पाडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विंडीज तर्फे होपने सर्वाधिक १२३ धाव बनवल्या तर हेटमेयरने त्याला ६४ चेंडूत ९४ धाव ठोकत भक्कम साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 321 धावांपर्यंत मजल मारत विंडीजसमोर विजयासाठी 322 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 322 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजने वेगवान सुरुवात करताना पहिल्या दहा षटकांत 2 गडी गमावताना 72 धावांपर्यंत मजल मारत वेगवान सुरुवात केली.

वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. मात्र, पहिल्या सामन्यात नाबाद 152 धावांची खेळी करणारा रोहित शर्मा आज केवळ 4 धावा करुन परतला. तर दुसरा सलामीवीर शिखर धवन चांगल्या सुरुवाती नंतर 30 चेंडूत 29 धावा करुन परतला. त्यामुळे भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर आणि रोहित संघाच्या 40 धावा झाल्या असताना माघारी परतले. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायुडूने भारताचा डाव सावरला.

विराटने रायुडूच्या साथीने धावफलक हालता ठेवला. रायुडूने जम बसल्यानंतर आक्रमक पवित्रा धारण केला. दुसऱ्या बाजुने त्याला विराट चांगली साथ देत होते. दरम्यान, दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. पण, रायडू आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यावेळी रायुडूने 80 चेंडूत 8 चौकारंच्या मदतीने 73 धावांची खेळी करताना विराटच्या साथीत 24.4 षटकांत 139 धावांची भागिदारी केली. रायडू बाद झाल्यानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या विराटने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 81 वी धाव काढत एकदिवसीत कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. याचबरोबर विराटने सचिनचे सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रम मोडला. विराटच्या जोडीला आलेल्या महेंद्रसिंह धोनीने मात्र निराशा केली. तो 25 चेंडूत 20 धावा करुन माघारी परतला. तो बाद झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या ऋषभ पंतनेही सर्वांना निराश केले. वेगाने धावा बनविण्याच्या नादात 17 धावांवर तो बाद झाला.

दरम्यान, यानंतर विराटने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील 37 वे शतक पुर्ण करत एकाच वर्षात केवळ 11 सामन्यांमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला. तसेच, त्याचे हे या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसरे शतक ठरले. यानंतर त्याने सामन्याच्या 43 व्या षटकांत 248 धावांवर असणाऱ्या भारताच्या धावा विराटने आपल्या फटकेबाजीच्या जिवावर 47 षटकात 285 वर पोहचल्या. त्यानंतर विराटच्या नाबाद 157 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने 50 षटकांत 6 बाद 321 धावा केल्या. विराटने आजच्या सामन्यात 129 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या बळावर नाबाद 157 धावा केल्या. दोन मोठे विक्रम नोंदवले असून एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्या 13 खेळाडूंमध्ये आपले नाव नोंदवले. दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांमध्ये पाच भारतीय, चार श्रीलंकन आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तानच्या एका खेळाडूचा समावेश आहे. भारताकडून आता पर्यंत 5 खेळाडूंनी 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. ज्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)