विंग येथील आखाड्यात नामवंतांच्या कुस्त्या रंगल्या

ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन

शिरवळ – श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त विंग (ता. खंडाळा) येथे कुस्त्यांचा जंगी आखाडा उत्साहात पार पडला. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी या आखाड्यात सहभाग घेतला. या आखाड्यात अनेक कुस्त्या चितपट झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पैलवान विष्णू खोसे याच्यावर एकलंगी डावात अक्षय शिंदे याने विजय मिळवला. यावेळी पंच म्हणून सुनील थोपटे, चंद्रकांत तळेकर, आबा तळेकर,रामभाऊ महांगरे यांनी काम पाहिले. यावेळी जि. प. सदस्य उदय कबुले, माजी जि. परिषदेचे उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील आणि सभापती मकरंद मोटे, पं. समिती सदस्य राजेंद्र तांबे आणि चंद्रकांत यादव असे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त विंग येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी भैरवनाथ देवाच्या पालखीची आणि शंभू महादेवाच्या कवडीची ढोल-ताश्‍याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ढोल लेझीम,दांडपट्टा, मल्लखांब या मोठ्या खेळांची पथके दाखल झाली. त्यानंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. त्यात पुणे आणि सातारा येथून आलेल्या नामवंत पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. जवळपास शंभर पैलवानांनी सहभाग घेतला. सात हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षिसे, तसेच पॅशन-प्रो ही दुचाकी आणि आकर्षक चांदीच्या गदा,बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या होत्या.

पहिल्या नंबरचा कुस्तीचा मानकरी अक्षय शिंदे ठरला. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती याचे नियोजन ग्रामस्थ मंडळ विंग यांनी केले होते. या वेळी सूत्र संचालन संतोष मोकाशी, विजय तळेकर, मयूर तळेकर यांनी केले, तसेच गावामध्ये ग्राम विकास मंच विंग यांच्या वतीने यात्रेच्या कालावधीत जुने कपडे, शालेय उपयोगी वस्तू, खेळणी, गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विंग गावातील ग्रामविकास मंचच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. झाडे लावा – झाडे जगवा, पाणी वाचवा – जीवन वाचवा, आणि स्वच्छ विंग – सुंदर विंग असे संदेश देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)