आरटीओ कार्यालयात महिन्यात ट्रॅक सुरू होणार
गोडोली सातारा आरटीओ कार्यालयात वाहनांच्या पासिंगसाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना कराडला जावे लागत आहे . यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने सातारा आरटीओ कार्यालयात ट्रॅक सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, गेली सहा महिने सातारा पालिकेत वृक्ष तोडण्यासंदर्भात प्रलंबित असलेला प्रस्ताव मार्गी लागल्याने ट्रॅक मार्गातील झाडे तोडून ट्रॅकच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आता पुढील एक महिन्यात ट्रॅक तयार होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.
सातारा आरटीओ कार्यालयात वाहनांना पासिंगसाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. शासकीय जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्तावही गेली अनेक महिने लालफितीच्या कारभारात अडकला होता. अशातच जिल्ह्यातील सर्व वाहने कराड आरटीओ कार्यालयात पाठवली जात असल्याने वाहनधारकांची धावपळ होत होती. फलटण, खंडाळा, महाबळेश्वर-पाचगणी आणि माण-खटावच्या नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
यासोबत वाहतूक संघटना ही आक्रमक झाल्या होत्या. सातारच्या आरटीओ कार्यालयात तात्काळ ट्रॅक निर्माण करावा, असा जनरेटा वाढत होता. ट्रॅक तयार करण्यासाठी टी अँड टी इन्फ्रा कंपनी तयार झाली असली तरी ट्रॅक मार्गात चार झाडे असल्याने ती तोडण्यासाठी सातारा पालिकेने मंजुरी दिलेली नसल्याने अडचण निर्माण झाली होती. सहा महिने रखडलेला प्रस्ताव वृक्ष कमिटीच्या बैठकीत मंजूर झाला असल्याने नुकतेच आरटीओ यांनी नगरपालिकेत चलन भरले आणि वृक्षतोडीसाठी अधिकृत परवानगी घेतली. त्यानुसार शनिवारी ट्रॅक मार्गातील झाडे तोडण्यात आली असून लवकरच ट्रॅकचे काम पूर्ण होऊन वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे संजय धायगुडे यांनी सांगितले
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा