वाहन चालकांना “बुरे दिन’

पिंपरी – पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची भिती व्यक्त होत आहे. धावत्या शहराबरोबर धावण्यासाठी वाहन वापरण्याखेरीज पर्याय नाही. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी असल्याने खासगी वाहनांचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीची मोठी झळ शहरवासियांनी बसत आहे. याबाबत दैनिक “प्रभात’ने विविध स्तरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी संताप व्यक्त केला.

शहरवासियांना पीएमपीएमएलच्या बसेस खेरीज अन्य कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. शहरातील अनेक अंतर्गत भागात अद्याप बस पोहचत नाही. बसेसची संख्या अपुरी आहे. त्यातच कामाचे आणि बसचे वेळापत्रक यात सांगड घालणे अशक्‍य आहे. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्राला घरघर लागल्याने शहरवासीय लगतच्या शहर, ग्रामीण भागात कामा-धंद्यासाठी जात आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अद्यापही मोठ्या प्रमाणावर पुण्यावर विसंबून रहावे लागत आहे. पर्यायाने नोकरदारांपासून ते विद्यार्थी वर्गापर्यंत खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. महिला वर्गाकडूनही वाहनांचा वापर होतो. रस्त्यावर पादचारी कमी दिसतात पण वाहन धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली दिसत आहे. यामुळे वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दराने वाहनधारकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

पेट्रोल व डिझेलवरचा अबकारी कर कॉंग्रेस आघाडी सरकारने मे 2014 पासून 11 वेळा वाढवला होता. भाजप सरकारही त्यांचीच री ओढत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कायम चढेच आहेत. कर मिळवण्याच्या नादात नागरिकांवर सरकार मोठ्या प्रमाणात अन्याय करत असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत चालले आहे. औद्योगिक परिसरातील क्रेन व्यावसायिक सततच्या इंधन दरवाढीमुळे जेरीस आले आहेत. क्रेन व्यावसायिकांना डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. औद्योगिक परिसरात अद्याप मंदी सदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे कामे मिळवण्यासाठी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत वाढत्या इंधन दरवाढीच्या आधारे सेवेत दरवाढ करता येत नाही. विचित्र कोंडी क्रेन व्यावसायिकांमध्ये आहे.
बबन मुटके, क्रेन व्यावसायिक.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसाठी “डायनॅमिक प्राईस’ पद्धत सरकारने अवलंबली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर दररोज बदलत असल्यामुळे त्याच धर्तीवर पेट्रोल-डिझेलचे दर ठरवणारी ही पद्धत आहे. हे करताना पेट्रोल व डिझेलवरील अधिभाराचा विचार केला गेला नाही. त्यामुळे पेट्रोल- डिझेल पैशापैशाने वाढतच चालले आहे. दरवाढीचे हे “स्लो-पॉयझनिंग’ आहे. कच्च्या तेलावर पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात असा युक्तिवाद केला जात असला तरी कच्च्या तेलाचे दर घसरले असतानाही पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच असल्याचे मागील काही महिन्यांमध्ये पहायला मिळाले. ग्राहकांची ही विनाकारण केली जाणारी लूट आहे. एंट्री टॅक्‍स, रिफायनरी, लॅंडिंग कॉस्ट, ट्रान्स्पोर्ट, एक्‍साईज, व्हॅट आणि इतर कर, पंप चालकांचे कमिशन मिळून पेट्रोल दर आकारले जातात. त्यामुळे करापोटी ग्राहकांना लिटरमागे साधारणतः 40 ते 50 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. यातून सर्वसामान्यांची सरकारला चिंताच नसल्याचे स्पष्ट होत आहे.
-कुणाल जगनाडे, उद्योजक.

शासनाला महसूल मिळण्याचे पेट्रोल आणि दारू दोन मुख्य स्त्रोत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विकासाच्या नावाखाली गरीब जनतेच्या खिशातून पैसा उकळत असल्याचा संशय वारंवार होणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीतून येत आहे. कच्च्या तेलाचे दर उतरत गेले, तसतसे पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर आणि सेस लावून सरकारने चालू खात्यातील तोटा कमी करण्यावर भर दिला. मात्र, दर कमी होत असताना त्याचा थेट फायदा ग्राहकाला दिला गेला नाही. कच्च्या तेलाचे दर वाढताच पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जाते. दररोज दरवाढ करुन रोजच ग्राहकांचा खिसा कापण्याचे धोरण सरकारने आखले आहे. ग्राहक कधीही लिटरच्या दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करत नाही. तर विशिष्ट रकमेने खरेदी करतात. यामध्येही पेट्रोल-डिझेल पंप चालकांकडून मारले जाते. दरवाढीमुळे सरकार, पंप चालक सगळेच फायद्यात आहेत. त्याची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे.
– इरफान सय्यद, अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटना.

मागील काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, मागील नऊ दिवसांपासून सातत्याने दरवाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. दररोज आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने पेट्रोल टाकायचे की नाही अशी परिस्थिती नागरिकांसमोर उभी राहिली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या जशा जीवन जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी आहेत. तशाच पेट्रोल, डिझेल ही आज सर्वसामान्यांसाठी आवश्‍यक बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्याने ही दरवाढ होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, इंधनावरील अबकारी कर व वाढते दर याची सांगड सरकारला घालता येत नसल्याने इंधन दरवाढीचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत.
– संदीप पवार, युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)