वाहनांच्या तोडफोड प्रकरणी अकराजणांवर गुन्हा दाखल

पिंपरी – रहाटणी येथे किरकोळ वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने तलवारी हातात घेवून दहशत निर्माण केली. तसेच, रस्त्यावर उभा केलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि 21) रात्री अकराच्या सुमारास रहाटणीतील बळीराज कॉलनी येथे घडली.

या प्रकरणी मालिणी संजय नखाते (40, रा. रामनगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदीप सूर्यवंशी, आकाश कुसाळकर, ज्ञानेश्वर सगर, अजय म्हस्के यांच्यासह 7 अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मालिनी यांचा हॉटेल व्यवसाय असून गुरुवारी त्याच्या हॉटेलसमोर तरुणांचा किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी मालिनी आणि त्यांचे पती संजय यांनी मध्यस्थी करीत तो वाद मिटवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, रात्री आकाराच्या सुमारास मालिनी आणि संजय हॉटेल बंद करून घरी जात असताना समोरून अचानक दहा ते अकराजण हातात लाकडी दांडकी व तलवारी घेऊन आले. यावेळी भेदरलेल्या मालिनी यांनी पती संजय यांना तेथून पळून जाण्यास सांगितले. संजय तेथून निघून गेल्यानंतर मालिनी आरोपींना बायकांवर हल्ला करताय काय, लाज वाटत नाही काय असे म्हणाल्या. त्यामुळे चिडलेल्या आरोपी सूर्यवंशी याने त्यांच्या अंगावर तलवार उगारून तुम्हालाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच त्याने मालिनी यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये मालिनी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यानंतर टोळक्‍याने रस्त्यावर पार्क केलेल्या आठ वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)