वाहनचोरी करण्यारी टोळी जेरबंद

मंदिरातील चोऱ्याप्रकरणी नऊ तर वाहनचोरीचे सहा गुन्हे उघड
घोडेगाव  -वाहने व मंदिरातील चोऱ्याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घोडेगाव, आळेफाटा, मंचर, चाकण, जुन्नर, नारायणगाव, खेड येथील सुमारे 9 मंदिरातील चोऱ्या व 6 वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
संदीप हेमा बुळे (वय 21), अर्जुन विलास लांडे (वय 19), घनशाम होना बोऱ्हाडे (वय 19), रविंद्र अंकुश बोऱ्हाडे (वय 19) व भरत किशन घुटे (वय 19, रा. सर्वजण देवळे, ता. जुन्नर) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस फौजदार किरण भालेकर व काही कर्मचारी दि. 4 ऑगस्ट रोजी मंचर – भीमाशंकर रस्त्यावर गस्त घालत असताना पेट्रोल पंपाजवळ रात्री सव्वानउच्या सुमारास झाडांच्या आडोशाला अंधारात काहीतरी बोलण्याचा आवाज आला. त्या ठिकाणी पाच तरूण मिळून आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, पक्‍कड, लोखंडी कटावणी, मिरची पूड व एक दोरी मिळून आली. त्यावरून हे पाच तरूण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे वाटले.
या पाचही जणांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून अनेक गुन्हे बाहेर निघाले. यातील संदीप बुळे हा जुन्नर येथे हॉटेलमध्ये काम करत होता. त्याच्या सहवासात बाकीचे चार तरूण आले. काम न करता भरपूर पैसे कमविण्यासाठी या पाच जणांनी मिळून गाड्या तसेच मंदिरात चोऱ्या करण्याचा डाव आखला. त्याप्रमाणे त्यांनी घोडेगाव, आळेफाटा, मंचर, चाकण, जुन्नर, नारायणगाव, खेड पोलीस ठाण्यांचय हद्दीत अनेक मंदीरे फोडून चांदिचे मुखवटे, वस्तू चोरल्या तसेच त्यांच्याकडून सहा दुचाकीदेखील हस्तगत करण्यात आल्या. या पाच जणांनी घोडेगाव परिसरातील गोहे येथील सालसिद्धेश्‍वर मंदिर, साल येथील सालोबा मंदिरात चोरी केली. तसेच नारोडी येथील बॅंकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले. या चोरांना पकडल्यामुळे मागील वर्षापासून होत असलेल्या मंदिर चोऱ्या कमी होणार आहेत.
या तपासात सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस फौजदार किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार युवराज भोजने, एम. बी. सरोदे, डी. एन. धादवड, एस. एम. तळपे, डी. एच. वाघोले, आर. डी. तांबे, डी. के. जठर, एस. एम. लांडे यांनी तपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)