वाहनचोरीचे 10 गुन्हे उघड

पिंपरी  – वाहनचोरी करणाऱ्या सोसायटीच्या सुपरवायजरसह सहा अट्टल चोरांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यामधून वाहनचोरीची 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

मयूर दिलीप जाधव (वय-19 रा.सिंधखेड, धुळे), प्रवीण सुरेश बोरसे (वय 29, रा. बीजलीनगर, चिंचवड), शुभम उर्फ दत्त भिकाजी मोहंडे (वय 20, रा. थेरगाव), नीलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय 20, रा. लक्ष्मण नगर , थेरगाव), राजू लक्ष्मण पाटेकर (वय 19, रा. पवना नगर, काळेवाडी) आणि सलमान गौस शेख (वय 24, रा. मिलिंदनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वेगवेगळ्या तपासामध्ये सहा अट्टल चोरांना अटक केली आहे. त्यामध्ये वाकडमधील डायनेस्टी सोसायटीमध्ये सुपरवायजर असलेल्या नीलेश परदेशी याला एक महिन्याचा पगार न मिळाल्याने त्याने नोकरी सोडली. याचठिकाणी त्याचा साथीदार शुभम मोहंडे हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या साथीने सोसायटीमध्ये प्रवेश करत,पार्किंगमधील बुलेट व मोपेड गाडीची चोरी केली होती. दुसऱ्या तपासात राजु लक्ष्मण पाटेकर याला संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड झाले.त्याच्याकडून 1 लाख 65 हजार रुपयांच्या तीन ऑटोरिक्षा व एक दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आणखी एका गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सलमान गौस शेख याला गस्त घालत असताना अटक केले. त्याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघड झाले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या पाच मोटर सायकल जप्त केल्या आहेत.

यातील मयूर जाधव याला पोलिसांनी धुळे येथून अटक केले आहे. डायनेस्टी याच सोसायटीमध्ये होणाऱ्या वहानचोरी संदर्भात तपास करत असताना मयूर याने चोरलेल्या दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यादव हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. या तपासामध्ये पोलिसांनी 3 ऑटोरिक्षा व आठ दुचाकी असा 4 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)