वाहतूक शैक्षणिक अभ्यासक्रमात 72 चुका

शिक्षण विभागाला येईना जाग:मधूकर शेबंडेंचा पाठपुरावा सुरू
सातारा,दि.28 प्रतिनिधी- शिक्षण विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेचा पाया समजला जातो. मात्र विद्यार्थीदशेतच चुकीचा अभ्यासक्रम शिकविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेली सहा वर्ष इयत्ता 9 च्या आरएसपी व एमसीसीच्या हस्तपुस्तिकांमध्ये वाहतूक चिन्हांच्या तब्बल 72 चुका असल्याचे वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी निदर्शनास आणले तसेच माजी आमदार मोहन जोशी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून देखील अद्याप शिक्षण विभागाला जाग येत नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मार्फत सन. 2012 साली इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा हे रहदारीच्या नियमावर आधारीत हस्तपुस्तिका प्रकाशित करण्यात आले. त्यामध्ये वाहतूक रहदारीचे 46 चिन्ह चुकीच्या पध्दतीने छापण्यात आली आहेत. तसेच 2012 साली महाराष्ट्र छात्र सेना (एमसीसी) हे पुस्तक आपत्ती व्यवस्थापन रहादारी नियम या विषयावर आधारीत प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात रहदारी नियमबाबत 26 चुका आहेत. अशा एकुण 72 चुका असल्याचे वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी सन.2012 सालीच उघडकीस आणले होते.
याबाबत तत्कालिन आमदार मोहन जोशी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालिन सचिव कृष्णकुमार पाटील यांनी चुका मान्य करून अभ्यासक्रमात दुरूस्ती करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, सहा वर्ष उलटून ही अद्याप पुस्तिकांमध्ये कोणतीही दुरूस्ती करण्यात आली नाही. उलट या ही वर्षी तोच चुकीचा अभ्याक्रम विद्यार्थ्यांना शिकविला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे ही नुकसान होत आहे. याबाबत मधुकर शेंबडे यांनी दोंन्ही पुस्तिका दुरूस्ती करून नवीन हस्तपुस्तिका छापाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सातारा जिल्हा पालकमंत्री व अनेक आमदारांच्याकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाच्या, सुरक्षेच्या व सुरक्षित रस्ता वाहतुकीसाठी महाराष्ट्र शासन गांभीर्य पुर्वक मागणी मान्य करेल या दृढ विश्‍वासाने वाहतुक विषयाचे गाढे अभ्यासक व निवृत्त माध्यमिक शिक्षक श्रीयुत मधुकर शेंबडे यांनी सदरची मागणी शासनाकडे केलेली आहे.
बारा वर्षात शंभर चुका दुरूस्त
मधुकर शेंबडे हे महाराष्ट्र पोलिस दलास वाहतुक व्यवस्थापन या विषयावर महाराष्ट्रभर पोलिस दलास प्रशिक्षक म्हणुन काम करीत आहेत. मधुकर शेंबडे यांनी इयत्ता पहिली, तिसरी, चौथी, पाचवी, नववी, दहावी पाठ्यपुस्तकातील मराठी, हिंदी, इंग्लिश, नागरी संरक्षण, एमसीसी या पुस्तकातील गेल्या 12 वर्षामध्ये 100 चुका रहदारी नियम व रस्ता वाहतुकीची चिंन्हे याबाबत शिक्षण विभागाला कळवून काही दुरूस्त्या करवून घेतल्या असून आता उर्वरित 72 चुका दुरूस्त करून घेण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
शासनाने दुरूस्ती केलीच पाहिजे – मा.आ.मोहन जोशी
तत्कालिन आमदार मोहन जोशी यांनी 72 चुकांचा मुद्दा नागपूर अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर दुरूस्ती करण्याचे आश्‍वासन शिक्षण मंडळांच्या सचिवांनी दिले होते. मात्र, अद्याप दुरूस्त्या करण्यात आल्या नाहीत. त्याबाबत जोशी यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता ते म्हणाले, पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असते. आणि अशा पध्दतीने विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण अद्याप दिले जात असेल तर शासनाचा हा नाकर्तेपणा आहे त्याचा आम्ही निषेध करतो. शासनाने लवकरात लवकर ही चुक दुरूस्त करावी अशी मागणी करतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)