वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबईत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबविणार

मुंबई – सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
गेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.

आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्‍य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परिवहन विभागाने राबविलेल्या “नो हॉंकिंग’ उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटिलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)