वाहतूक नियमांचा बट्ट्याबोळ

पिंपरी – वाहतुकीचे नियम हे मोडण्यासाठीच असतात असे चित्र पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानच्या दहा मुख्य चौकांमध्ये पहायला मिळाले. सर्वच चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिव्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव, बेशिस्त वाहन चालक, रिक्षांचे अनधिकृत थांबे यामुळे चौकाचौकात वाहतूक नियमांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी हा भाग येतो. चारपदरी रस्ता, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, बीआरटी लेन अशा वेगवेगळ्या स्थितीतून जाणाऱ्या या रस्त्यावर चोविस तास वर्दळ असते. या मार्गावरील बीआरटी सुरु न झाल्याने बीआरटी लेन ओसाड तर साईड रस्त्यावर वाहतूक कोंडी असे चित्र सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी दिसून येते. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिकफाटा, पिंपरी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबामाळ चौक, निगडी टिळक चौक आणि भक्ती-शक्ती चौक हे दहा मुख्य चौक या मार्गात येतात. मात्र प्रत्येक चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या असमानवेळा पहायला मिळतात. प्रशस्त रस्ता असूनही बेशिस्त वाहतुकीमुळे चौकाचौकात रहदारीच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे.

प्रत्येक चौकात रिक्षा व्यावसायिक रिक्षा थांबा सोडून थांबलेले असतात. प्रवाशांना आपल्या रिक्षामध्ये बसवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असते. अधिकृत थांबे असतानाही केवळ प्रवाशांची पळवापळवी करण्याच्या नादात प्रत्येक चौकाला ओंगाळवाणे स्वरुप आल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी खासगी वाहने उभी केली असल्याचे पहायला मिळाले. नाशिकफाटा, भक्ती-शक्ती चौकात ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बस भर चौकात थांबतात. चिंचवड स्टेशन येथील बिग बझार, डी-मार्ट, फुगेवाडीतील मेगा मार्ट, महापालिका मुख्यालयासमोरची वाहने महामार्गावरच उभी केलेली असतात. कासारवाडी भागात रस्त्यावरच वाहने उभे करण्याचे विदारक चित्र आहे. या परिसरातील रहिवासी बिनदिक्कत याठिकाणी रात्रीच्या वेळी वाहने उभी करतात.

प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रक दिवा (सिग्नल) असला तरी सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी न दिसल्यास दुचाकी व रिक्षाच नव्हे तर मोठी वाहने सुध्दा सिग्नल पाळत नसल्याचे दिसून आले. प्रत्येकाला सिग्नल सोडून वाहने पुढे दामटण्याची घाई असते. काहीजण तर हिरवा दिवा लागायच्या आतच चौकाच्या मध्यापर्यंत वाहने घेवून येतात. त्यामुळे सिग्नल मिळालेल्या वाहनांना रस्ता मिळत नाही. परिणामी वाहतूक कोंडी होते. पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करत असताना दुसरीकडे वाहन चालक देखील आपल्या बेशिस्तीचे दर्शन घडवतात. फुगेवाडी, शंकरवाडी, डेअरी फार्म, एच. ए. कंपनी, चिंचवड स्टेशन येथे सर्रास शॉर्टकटसाठी उलट दिशेने वाहने हाकली जातात. महाविद्यालयीन युवक वेडीवाकडी वाहने पळवतात. वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियमन सोडून वाहन परवाना तपासणीच्या मागे लागलेले असतात. चौकामध्ये एक-दोन वाहने बाजूला घेवून त्यांची अडवणूक सुरु असते. त्यांना कायद्याचा बडगा दाखवून चिरीमिरी कशी वसूल करता येईल, याच्या प्रयत्नात असल्याचे पहायला मिळाले.

वाहतूक नियमन सोडून ‘लपाछपी’
काही पोलीस कर्मचारी तर वल्लभनगर येथे ग्रेडसेपरेटरमध्ये अडोशाला थांबून वाहने अडवतात. मागील नाशिकफाटा चौकात वाहतुकीची बोंब होत असताना पोलिसांची ग्रेडसेपरेटरमध्ये पोलिसांची सुरु असलेली लपाछपी प्रवाशांच्या संतापात भर घालत आहे. डेअरीफार्म, एच. ए. कंपनीसमोरील भुयारी मार्ग याठिकाणीही पोलीस लपाछपी खेळत असल्याचे पहायला मिळते. फुगेवाडी, खंडोबामाळ चौक येथे अभावाने पोलीस कर्मचारी पहायला मिळतात. कर्णकर्कश फॅन्सी, चायनीज हॉर्न वाजवत जाणाऱ्या टवाळखोरांकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. उलट आयतेच कोलित सापडल्याच्या आनंदात सिग्नलला थांबणाऱ्या वाहन चालकाला बाजूला घेवून त्याच्याकडे कागदपत्रांचा आग्रह पोलीस करतात. वाहन परवाना असला तरी पीयुसी, वाहनाची कागदपत्रे अशा एक ना अनेक कागदपत्रांची मागणी करतात. कामाला निघण्याच्या वेळी, घाईगडबडीच्या वेळी कटकट नको म्हणून चिरीमिरी देवून नागरीक आपली सुटका करुन घेतात.

पोलीस कर्मचारी नसला की बरेचजण सिग्नल तोडून पळून जातात. आपल्याला पोलिसांनी पाहिले नाही, असा समज होतो. परंतु, आता सीसीटीव्हीच्या मार्फत पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. आपल्या गाडीचा नंबर पाहून कारवाई केली जात आहे. वाहतुकीचे नियम तोडून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्याची आणि राजकीय नेत्याला फोन करुन पोलिसांवर दबाव आणायची मानसिकता बदलायला हवी. वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवल्यास वाहतूक नियमन चांगल्या प्रकारे होऊन पोलिसांचे श्रम आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल.
– डी. व्ही. पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)