वाहतूक कोंडी होण्यास कर्मचारीच जबाबदार

वाहन चालकांना मन:स्ताप ः परिवहन मंत्री रावते यांच्याकडे तक्रार
पिंपरी, – शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडूनच अडथळा होऊन वाहतूक कोंडीमध्ये भर पडते, तर दुसरीकडे वाहन चालकाची अडवणूक करून भल्या मोठ्या रकमेची पावती किंवा रोख रकमेची वसूल केली जात आहे. हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आली आहे.
नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. शहराप्रमाणेच पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर शहरांमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे, मात्र हे कर्मचारी सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी होईल, अशा ठिकाणी पाच ते सहा पोलीस कर्मचारी उभे असतात. चौकात वाहतूक कोंडी कायम असते. त्यातच हे कर्मचारी वाहन चालकांची अडवणूक करतात. त्यामुळे त्यात अधिकच वाहतूक कोंडीची भर होते. आधीच पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे आपण नियम मोडला का? याचा विचार करून वाहन चालक घाबरलेला असतो. त्यानंतर नको ती कागदपत्रे वाहन चालकांकडे मागतात. त्यानंतर तडजोड म्हणून रोख स्वरुपात पैसे उकळतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत व नियंत्रित करण्याच्या त्यांच्या प्राथमिक कर्तव्याची जाणीव करून द्यावी. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये किमान शंभर मीटर अंतरापर्यंत कुठल्याही वाहनाला अडवू नये, त्याबाबत आदेश द्यावे. त्याचप्रमाणे वाहन चालकांशी सौजन्याने वागा, असे त्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष मानव कांबळे, दिलीप काकडे, उमेश इनामदार, अशोक मोहिते, गिरीधार लढ्ढा यांची स्वाक्षरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)