वाहतूक कोंडी सोडविणार मेट्रोचे “ट्राफिक मार्शल’

पिंपरी – पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. पिंपरी, कासारवाडी, दापोडीमध्ये मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असतानाच येथील सेवा रस्त्यावर वाहने उभी केल्याने ही समस्या जटील बनली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मेट्रोकडून ट्राफिक मार्शलची नेमणूक केली जाणार आहे. हे मार्शल वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना हटविणे, अनाधिकृतपणे गाड्या पार्क करणाऱ्यांवर वाहतूक विभागाच्या मदतीने कारवाई करणार आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडी नित्याची झाली आहे. महामार्गावर दापोडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. वाहन चालकांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागतो. सेवा रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कोंडीत भर पडते. तातडीने याबाबत उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दापोडीतील सीएमई चौकामध्ये पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला दुचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांना अडकून पडावे लागते. फुगेवाडी चौकातही अशीच परिस्थिती आहे. नो पार्किंगचे फलक लावलेले असतानाही वाहने उभी असतात. या परिसरातील हॉटेलमध्ये येणारे नागरिक रस्त्यावर डबल पार्किंग करतात. कासारवाडी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रिक्षा चालकांच्या थांब्यामुळे कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न
सेवा रस्त्यावर वाहने उभी केल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. यावर तोडगा काढण्यासाठी मेट्रोकडे वारंवार तक्रारी येत होत्या. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मेट्रोने ट्राफिक मार्शलची नियुक्ती केली आहे. एकूण 7 ट्रफिक मार्शल वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम पाहणार आहे. याशिवाय या रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास, किंवा अचानक काही प्रसंग निर्माण झाल्यास नागरिकांची तात्काळ मदत करण्यासाठी मार्शल तत्पर राहणार असल्याची माहिती मेट्रो रिच 1 चे प्रकल्प प्रमुख गौतम बिऱ्हाडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)