वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल

अनेक मार्ग बंद

प्रभात वृत्तसेवा

पुणे – गणेशोत्सवात देखावे पहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कालावधीत वाहतूक शाखेने मंगळवारपासून वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. हा बदल गणपती विसर्जनापर्यंत करण्यात आला आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दी लक्षात घेऊन सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत काही रस्ते वाहतूकीस बंद रहाणार आहेत. दरम्यान, पावसाळी
वातावरणामुळे गणेशभक्‍तांमध्ये अद्यापही देखावे पहाण्यासाठी उत्साह दिसत नाही. गौरी विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने गर्दी होईल, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

* शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्ता- अलका चौक- टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. सिमला चौक- कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक- बोल्हाई चौकमार्गे नेहरू रस्त्याचा वापर करूनही स्वारगेटकडे जाता येईल. गर्दीच्या वेळेत परिस्थितीनुसार पीएमपीएमएल बसेस वळविण्यात येतील.
* चारचाकी वाहनचालकांना गाडगीळ पुतळा- शाहीर अमर शेख चौक- तेथून पुढे नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच, जिजामाता चौक ते फुटका बुरूज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्यापासून नदीपात्रातील रस्त्याने भिडे पूल जंक्‍शनवरून अलका चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

* नेहरू रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्यावरून हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने जावे.
* अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीसाठी बंद रस्ते-
शिवाजी रस्ता – काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्‍शन ते जेधे चौक (सकाळी सात ते मिरवणूक संपेपर्यंत)
लक्ष्मी रस्ता – सोन्या मारुती चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी सात ते मिरवणूक संपेपर्यंत)
बगाडे रस्ता – सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी नऊ ते मिरवणूक संपेपर्यंत)
बाजीराव रस्ता – बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)
गणेश रस्ता – दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
केळकर रस्ता – बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
गुरुनानक रस्ता – देवजीबाबा चौक – हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी नऊ ते मिरवणूक संपेपर्यंत)
टिळक रस्ता – जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9 ते मिरवणूक संपेपर्यंत)
शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक (दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)