वाहतूक कोंडीवर आता “पंचसूत्री’ उतारा

दसरा होताच कारवाई : 100 ठिकाणी “नो व्हायलोशन झोन’


वाहतूक पोलीस, महापालिकेचा संयुक्त उपक्रम

-Ads-

पुणे – वाढती वाहतूक कोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून यावर मार्ग काढण्यासाठी आता पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील 100 ठिकाणी “नो ट्रॅफिक रुल व्हायलोशन झोन’ तयार करण्यात आले असून बेशिस्तांवर कारवाई होणार आहे. फुटपाथवरील हातगाड्या, नो पार्किंगमधील वाहने, बेवारस वाहनांसदर्भात आरटीओ, वाहतूक पोलीस, महापालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने धोरण ठरविण्यात आले असून “पंचसूत्री’ कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस जिद्दीला पेटल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती देण्यासाठी शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालय येथे महापालिका आयुक्त सौरभ राव, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) प्रभाकर ढमाले आदी उपस्थित होते.

सातत्याने कोंडी होणारे प्रमुख 100 चौक प्रशासनाने निवडले असून तेथे “नो व्हायलोशन झोन’ तयार केले आहे. तेथे जादा पोलीस कर्मचारी देत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. फुटपाथवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्यांवरही कारवाई केली जाणार आहे. तर, अधिकृत व्यावसायिकांना इतरत्र जागा दिली जाणार आहे.

प्रशासन नेमके काय करणार?
– शहरातील मुख्य रस्ते, चौकातील नो पार्किंगमधील वाहनांवर कडक कारवाई.
– बेवारस वाहनांची माहिती संकलित करुन त्यावर योग्य ती कार्यवाही.
– महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल हातगाड्या तातडीने हटविणे.
– काही रस्त्यांवर अधिकृत स्टॉल आहेत. मात्र, वाहतूक कोंडी होत असल्याने ते हटवून पुनर्वसन करणे.
– अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍सची माहिती घेऊन कारवाई

पूर्वतयारीसाठी पाच दिवस
शहरात सातत्याने कोंडी असलेले प्रमुख शंभर स्पॉट “नो व्हायलोशन झोन’ तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी कशाप्रकारे नियमांची अंमलबजावणी शक्‍य आहे, कारवाईसाठी लागणारी पूर्वतयारी आदी कामे दि.18 ऑक्‍टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. यानंतर दि.19 पासून प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे.

होर्डिंग न हटवल्यास थेट गुन्हा
जुना बाजार येथे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून होर्डिंग कारवाईवर लक्ष देण्यात येत आहे. महापालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगची माहिती संकलित करण्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून अनधिकृत होर्डिंगची माहिती संकलित करण्यात येणार असून ते हटवण्यासाठी संबंधितांना मुदत देण्यात येणार आहे. मात्र, मुदतीनंतरही होर्डिंग न हटवल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)