वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस रस्त्यावर

राजगुरूनगर-पुणे-नाशिक व शिरूर-भीमाशंकर या दोन्ही महामार्गावर राजगुरुनगर शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आज अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा महामार्गावर उतरला.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदार, प्रवासी यांची पुणे-नाशिक महामार्गावर रविवारपासून मोठी गर्दी झाली आहे. शहारातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील व्यापारी, छोटे दुकानदार त्यांची पार्किंग रस्त्यात व रस्त्याजवळ असते पर्यायाने वाहतूक सुरळीत राहण्यास अडचण येते. शहरातील वाहतुकीचे वाजलेले तीन-तेरा यामुळे शहरातील नागरिक प्रवास करणारे प्रवासी आणि पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे. शहरातील अवैध वाहतूक हटवण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे. राजगुरुनगर ही मोठी बाजार पेठ असल्याने जवळपासच्या तालुक्‍यातील मोठ्या संख्येने ग्राहक सोने, कपडे आदी वस्तू खरेदीसाठी येतात. शहरात अरुंद रस्ते आणि त्यावर ग्राहकांनी केलेली पार्किंग यामुळे शहरातून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने पार्किंग करू नयेत, यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मात्र रस्त्यात पार्किंग करणाऱ्या वाहनावर थेट कारवाई केली जाणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे या दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच होत चालली असताना पोलीस उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोन्पे व पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पोलीस दलाची मोठी फौज घेऊन वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग झोन, फलक लावून तयार करण्यात आले होते; मात्र नगरपरिषदेचे हे नियम दुकानदार व शहरातील नागरिक पायदळी तुडवत होते. तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असताना दिवसभर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे त्याचा त्रास प्रत्येक नागरिकाला होत होता. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासुन राजगुरुनगर शहरात होणारी वाहतूक कोंडी मोडुन काढण्यासाठी पोलीस दल मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहने रस्त्यात लावलेल्या वाहन चालकांची नागरिकांची धावपळ झाली.

  • सिंघमस्टाईल कारवाई
    मानवनिर्मित होणारी वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सिंघम स्टाईलचा वापर करत चार पोलीस अधिकारी, दंगल नियंत्रण पथकांच्या दोन तुकड्या घेऊन वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोन्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, उपनिरीक्षक नीलेश बडाख, वाहतूक पोलीस बागल, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या या कारवाईमध्ये सहभागी होत्या.
  • राजगुरुनगर शहरातील दोन्ही मार्गांवर दुकानांसमोर वाहनांची होणारी पार्किंग ही दुकानदाराची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्या त्या दुकान मालकांनी स्विकारावी व वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा दुकानांवरच कायदेशीर कारवाई केली जाईल.
    -गजानन टोन्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)