वाहतुकीचा कोंडाळा; नियमांकडे कानाडोळा

संग्रहित छायाचित्र

विश्रांतवाडी मुख्य चौकातील स्थिती : पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका

पुणे – वाहतूक कोंडीची समस्या विश्रांतवाडी चौकातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. याला सर्वाधिक फटका बेशिस्त वाहनधारकांमुळे बसत आहे. वाहतुकीची शिस्त पाळण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत या बेशिस्तांकडून सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर येवून थांबणे, सिग्नल न सुटताच वेगात निघून जाणे आणि विरुद्ध दिशेने येणे यामुळे अपघाताचा धोका संभवत आहे.

-Ads-

वाहतूक बेशिस्तीचा असाच प्रकार विश्रांतवाडी मुख्य चौकात दिसून येत आहे. त्यातही वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करणे आणि वाहनचालकांना शिस्त लावणे अपेक्षित असताना देखील नियम मोडणाऱ्यांकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळत आहे. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक झाली आहे. त्यात दररोज नव्या वाहनांची भर पडत आहे. परिणामी, वाहतुकीच्या समस्या समोर येत आहे. विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात – धानोरी, एअरपोर्ट, पुण्याकडून येणारा रस्ता तसेच आळंदीकडून पुण्याला जाणारा रस्ता हे सर्व मार्ग चौकात एकत्र येतात. यामुळे सतत वर्दळ असते. त्यात दुचाकीसह ट्रकचाही समावेश असतो. सकाळ आणि सायंकाळी यात आणखी वाढ होते. यामुळे तासन्‌तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यात काही बेशिस्त वाहनचालकांकडून सर्रास नियमांचे उलंघन होत असल्याने इतर वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांवरून येणारे वाहनचालक हे सिग्नल सुटण्याआधीच पुढे येऊन थांबतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नल सुटला आहे, त्यांना पुढे जाणेही अवघड होते. त्यामुळेही मोठी वाहतूक कोंडी होते. तसेच, येथील सिग्नल हे केवळ शोभेची वस्तू बनली आहे. त्यात वाहतूक विभागाकडून नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचाही वापर होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी नियम मोडण्याचा सपाटाच लावला आहे. काहीवेळा नियमनासाठी असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच काही महाभागांकडून बेदरकारपणे नियमांचे उलंघन केले जात असल्यामुळे वाहनचालक सुसाट आणि वाहतूक पोलीस कोमात अशी अवस्था झाली आहे.

धानोरी रस्त्यावर रिक्षाचालकांचा “कब्जा’
विश्रांतवाडी ते धानोरी रस्त्यावर शेअरिंग रिक्षाचालकांकडून कब्जा करण्यात आला आहे. हा रस्ता प्रार्थनास्थळे आणि दुकानांमुळे आधीच वाहतुकीसाठी तोकडा झाला आहे. त्यातही हे रिक्षाचालक रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असते. दरम्यान, या रिक्षांमधून अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक केली जाते. हे सर्व वाहतूक पोलिसांसमोर सुरू असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असून कारवाई होताना दिसून येत नाही.

झेब्रा क्रॉसिंग गेले कुठे?
पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावे, यासाठी प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात येतात. मात्र, विश्रांतवाडी मुख्य रस्त्यांवरील हे पट्टेच काही ठिकाणी पूर्णपणे गायब झाले आहेत. तर, काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर वाहनचालक सर्रास पुढे येवून उभे राहतात. याचा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडतांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कसरत करत रस्ता ओलांडावा लागत असल्यामुळे अपघाताचाही धोका आणखी वाढला आहे.

सेवा रस्त्यावर पार्किंग आणि “दुकान’
विश्रांतवाडीतील बिग बाजार समोरील सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे ठेलेवाल्यांकडून बस्तांन बसवण्यात आले आहे. त्यात येथील आस्थापनांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांकडून या सेवा रस्त्यावरच वाहने पार्क केली जाते आहेत. तसेच येथील ग्राहकांनाही रस्त्यावरच उभे राहावे लागते. त्यामुळे हा रस्ता अर्धाहून अधिक छोटा झाला असून पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यात सायंकाळी वर्दळ वाढल्यानंतर अधिक समस्यांना तोंड देत पुढे जावे लागते.

बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू असते. पीक अव्हर्स दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्य दिले जात असून यावेळेस इतर कारवायांवरील लक्ष थोडे कमी होते. याचदरम्यान, इतर वाहनचालकांकडून काही प्रमाणात फायदा उठवला जात आहे. मात्र, अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाईल.
– एस. एस. गोरे, सहायक पोलीस निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)