वाहक, चालकांच्या घरवापसीला हिरवा कंदील

पुणे – वर्षानुवर्षे बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि घरापासून लांबवर नोकरी करणाऱ्या वाहक आणि चालकांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यांच्या विनंतीनुसार त्यांची घराजवळ बदली करण्यास “हिरवा कंदील’ दाखविण्यात आला आहे.

परिवहनमंत्री आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील तब्बल साडेतीन हजार वाहक आणि चालकांना याचा लाभ होणार आहे. बदली झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 7 जानेवारीपर्यंत कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामंडळाच्या वतीने वाहक आणि चालक पदासाठी जाहिराती काढल्यानंतर कोकण विभागात या पदासाठी सहसा कोणीही अर्ज दाखल करत नाही. स्थानिक तरुण या पदासाठी अर्ज दाखल करत नसल्याने त्याठिकाणी नेमणूक होइल अशी शक्‍यता गृहीत धरून पुणे आणि राज्यातील बहुतांशी तरुण हे कोकण विभागासाठी अर्ज दाखल करत असतात. त्यामुळे बदलीसाठी अर्ज करण्यात आलेले बहुतांशी चालक आणि वाहक कोकण विभागात कार्यरत होते. वर्षानुवर्षे हे कर्मचारी घरापासून लांब असल्याने त्यांनी वारंवार बदलीसाठी महामंडळाकडे अर्ज दाखल केले होते. मात्र, प्रशासकीय आणि महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे ही बाब शक्‍य नव्हती. यासंदर्भात या वाहक आणि चालकांनी त्या त्या वेळच्या परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तरीही त्यांना यामध्ये यश आले नव्हते. राज्याच्या परिवहन खात्याची सूत्रे स्विकारल्यानंतर दिवाकर रावते यांनी स्वत:हून यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार देओल, महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर विनंती अर्ज केलेल्या वाहक आणि चालकांच्या बदल्या करण्यात आल्या.

पाठपुरावानंतर बदल्या
एसटी कामगार सेनेचे स्वारगेट डेपो सचिव उल्हास बढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे वाहक आणि चालक नियुक्तीपासून बाहेरगावाच्या आगारात असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उर्वरीत वाहक आणि चालकांच्या लवकरात लवकर बदल्या करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)