वास्तुपूजेच्या आदल्या दिवशी घर ‘बेचिराख’

पुणे – अहोरात्र मोलमजुरी, कचरा वेचून जमा झालेल्या पैशांतून त्यांनी स्वप्नातले घर उभारले… त्यासाठी लाखोंचा खर्च करुन वास्तूपूजेसाठी नातेवाईकांना आमंत्रणही देण्यात आले. ठरल्यानुसार गुरुवारी (दि.29) वास्तूशांत होती. मात्र, बुधवारचा दिवस उजाडला आणि त्यांच्या या स्वप्नातील घराची काही क्षणांत राखरांगोळी झाली. उघड्या डोळ्यांनी हे चित्र समोर पाहताना कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

ही परिस्थिती सांगितली राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या पत्नी आशा कांबळे यांनी. कांबळे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून पाटील इस्टेट येथे राहत असून “स्वच्छ’ संस्थेत कचरा वेचक आहेत. कांबळे यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते. त्यानुसार गुरूवारी वास्तुपूजेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पाहुण्यांना आणि शेजाऱ्यांना पत्रिका पाठविण्यात आली होती. केटरर्सना जेवणाची ऑर्डरदेखील देण्यात आली. याचबरोबर घराला लाईटिंग, कलर करुन ते सजविण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाआधीच घर आगीत सापडल्याने स्वप्न बेचिराख झाले. यात कांबळे दाम्पत्याचे दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. कांबळे हे नेहमी प्रमाणे बुधवारी कामासाठी गेले होते. त्यांना दुपारी दोनच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. हे कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोवर घरातील सर्व सामान, वास्तूपूजेसाठी आणलेले साहित्य, लाईटिंग जळून खाक झाल्याचे त्यांना दिसले.

आजवर कष्ट करुन कमावलेल्या पैशातून चांगले घर बांधले होते. गुरूवारी वास्तूशांत व सत्यनारायण पूजा होती. यासाठी आवश्‍यक तयारी झाली होती. मात्र, या आगीत घराचे स्वप्न उद्धवस्त झाले आहे. घरासाठी कर्जसुद्धा घेण्यात आले. आता ते कसे फेडायचे, हा प्रश्‍न आहे.
– राजेंद्र कांबळे, आपद्‌ग्रस्त


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
20 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)