#वास्तव: संघाचे “नवराष्ट्र’; सत्ताधाऱ्यांचे “मुक्‍त’ धोरण

अशोक सुतार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत खुली कार्यपद्धती असल्याचे विवेचन सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच केले आहे. ते संघाच्या कार्यक्रमात म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांत लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात एकाधिकारशाही चालत नाही. या भाषणात रा. स्व. संघ या संघटनेवर भागवत यांनी विस्तृत मांडणी केली व नरेंद्र मोदींनाच स्पष्ट संकेत दिलेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल भागवत म्हणाले की, संघ हा सर्व लोकयुक्‍त’ विचारांचा आहे. आम्ही मुक्‍तवाल्या विचारांचे नाही, असे म्हणत भागवत यांनी सत्तारूढ भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा समाचार घेतला. मूल्याधारित संस्कृती म्हणजेच हिंदूपणा. या हिंदूपणातून समाजाला उभे करण्याचा विचार म्हणजे संघाची कार्यपद्धती. समाज निर्माणसाठी व्यक्‍तीनिर्माण करायला हवे. हे काम संघ करत आहे. त्यातून समाज परिवर्तन होईल. त्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करण्याचा अथक प्रयत्न संघ करत आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात कॉंग्रेस नेत्यांचे योगदान विसरता येणार नाही, असे स्पष्ट बोलून त्यांनी मोदींना एकप्रकारे झटकाच दिला आहे. सतत कॉंग्रेसला लक्ष्य करणाऱ्या आणि गेल्या 60 वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे सांगणाऱ्या मोदींना भागवतांनी, कॉंग्रेसचा देशाच्या इतिहासात किती मोलाचा वाटा आहे, हे भाषणातून समजावून सांगितले. मोदी आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या अमित शहा यांनी यातून काय घ्यावे आणि काय नाही, हा त्यांचा प्रश्‍न आहे. देशभरातील हिंदू विचारसरणीच्या लोकांना एकत्र बोलावून नवराष्ट्र निर्मितीसाठी सुरू असलेल्या संकल्पात कॉंग्रेसचा विषय निघणे आणि त्यांच्या योगदानाबाबत चर्चा होणे, यातच मोदींची कार्यपद्धती कशी आहे, याची उत्तरे दडलेली आहेत.

संघाचे स्वयंसेवक असलेल्या मोदींची प्रतिमा सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी, राममंदिर उभारणारा, अल्पसंख्याकांचा विरोधक आणि विकास-पुरुष अशी निर्माण झाली; परंतु त्यांना आता सगळ्याच मुद्द्यांचा विसर पडला आहे. ज्या संघाच्या जीवावर भाजपने मोदींचा चेहरा समोर करून निवडणुका लढल्या, तोच संघ आज मोदींच्या भाजपला घरचा आहेर देताना दिसत आहे. तर, दुसरीकडे भाजपचे “हिंदुत्व’ हा कळीचा मुद्दा चोरण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्यामुळे मोदी आणि टीम विचारात पडली आहे. मोदी आणि संघाच्या विचारात व कृतीत काहीतरी तफावत होत आहे. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आतापर्यंत आपली राजकीय खेळी खेळली, आता तेच त्यांच्यापासून विरोधकांनी हिरावून घेतल्याचे देशात चित्र आहे.

संघीय विचारांची विश्‍व हिंदू परिषद ही हिंदुत्ववादी संघटना आज विस्कटली आहे. मोदींच्या वैयक्‍तिक वैरामुळे प्रवीण तोगडियासारखा कट्टर हिंदुत्ववादी नेता दूर झाला आहे. मोदी आणि शहा यांनी या संघटनेत दोन गट पाडले. तोगडियांनी तर मोदींविरोधात उघडपणे वक्‍तव्ये केली आणि राममंदिराची आठवणही मोदींना करून दिली. आज राममंदिराच्या मुद्द्यावर सतत भाजपला प्रश्‍न केले जातात, हिंदुत्ववादीही भाजपला तोच प्रश्‍न विचारतात; परंतु मोदी आणि शहा यांच्याकडून राममंदिराबाबत एकही ठोस उत्तर दिले जात नाही. हेच सर्वांना अगदी संघालाही खटकत आहे.

राममंदिराचा मुद्दा न्यायालयात आहे, हे मोदींचे ठरलेले उत्तर आहे. आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा राममंदिराचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपच्या हिंदुत्ववादाला उत्तर म्हणून मंदिर भेटी देत देवदर्शन करीत आहेत. राहुल गांधी नुकतेच मानस सरोवर यात्रेला जाऊन आले, तेथून आणलेले पवित्र जल त्यांनी राजघाटावर अर्पण केले. यातून स्पष्ट होत आहे की, भाजपचा कळीचा हिंदुत्व मुद्दा कॉंग्रेसने हायजॅक केला आहे. गोहत्यांवरून जमावाकडून होत असलेल्या हत्यांवरून भाजपला कॉंग्रसने यापूर्वीच खिंडीत पकडले आहे. अशा प्रकारे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला लक्ष्य करण्याचा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. संघाची द्वेष पसरवण्याची वृत्ती आपल्याला हटवायची आहे, असे सांगणाऱ्या राहुल गांधींनी संघाकडून संघटन शिकण्यासारखे आहे, असे मत मांडले आहे.

संघाची कट्टर हिंदुत्ववादाची संकल्पना सोडली तर संघाचे संघटन आणि समर्पकवृत्ती यांचा आदर्श कॉंग्रेसने घ्यायला हरकत नाही. आश्‍वासनांची खैरात वाटणाऱ्या मोदींच्या दाव्यांबाबत संघ नेत्यांनाही उत्तरे देताना अडचण येत आहे. कॉंग्रेसची स्तुती करून संघ एकप्रकारे भाजपला इशारा देत आहे की देशात ठोस कृती कार्यक्रम करून दाखवा; फक्‍त आश्‍वासने देऊ नका. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या व्याख्यानमालेत म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसचे मोठे योगदान होते. त्यांनी देशाला अनेक महापुरुष दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक नेते मिळाले. तिरंग्याचा व स्वातंत्र्याच्या सर्व प्रतीकांचा संघ सन्मान करतो व त्यांना पूर्ण समर्पित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)