वास्तवदर्शी ‘परी हूँ मैं’ 

योगायतन फिल्मस प्रस्तुत  ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट टीव्ही मालिका, रियालिटी शो या चंदेरीदुनियेच्या वेगळ्याविषयाची सफर घडवणारा एक हटके चित्रपट आहे. त्यात मनोरंजन क्षेत्राचा अविभाज्य घटक असलेल्या बालकलाकारांच्या विश्वाशी निगडीत अनेक बाबी अतिशय प्रभावीपणे आणि मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत.
‘परी हूँ मैं’  मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा मांडण्यात आली आहे. माधव दिघे (नंदू माधव) हे एक  विमा पॉलिसी विकून  जीवन व्यतीत करणारे  व्यक्ती आहेत, त्याची बायको कल्पना (देविका दफ्तरदार) ही  शिकवण्या करुन संसाराला हातभार लावत असते. त्यांची एकुलती एक मुलगी साजिरी (श्रुती निगडे) शाळेतील नाटकांत काम करत असते.  तिचा अभिनय पाहून शाळेतील एका मुलाचे वडील, जे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत असतात. साजिरीच्या अभिनयाची तिच्या वडिलांकडे स्तुती करतात व एका हिंदी मालिकेसाठी ऑडिशनसाठी जाण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला मध्यमवर्गीय मानसिकता आडवी येते. लहान मुलांनी अभ्यासावर लक्ष द्यावे असं आईचं ठाम मत असते. परंतु वडिलांना हा ‘चान्स’ घ्यावासा वाटतो. मग ते  ‘परी हूं मैं’ या हिंदी मालिकेसाठी ऑडिशन देऊन येतात.
काही दिवसांतच तिची मुख्य भूमिकेसाठी निवड होते. शूटिंग सुरु होते,  मालिका खूप लोकप्रिय होते व साजिरी स्टार होते. दिघे कुटुंबीयांचं जीवनच बदलून जाते. दरम्यान, साजिरीवर शाळा, शूटिंग, अभ्यास यांचा ताण पडला जाऊन ती अशक्त बनून आजारी बनते. त्यातच तिच्यासोबत तिच्या आईची प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (फ्लोरा सैनी) बिग बजेट चित्रपटासाठी तारखा उपलब्ध नसल्याने अचानकपणे टीआरपी मध्ये टॉप असलेली  मालिका सोडण्याचा निर्णय घेते. मग वाहिनीवाले ‘परी’ ला मोठी दाखवण्याचा ‘लीप’ घेतात त्यामुळे साहजिकच साजिरीची मालीकेतील भूमिका संपुष्टात येते. या गोष्टीचा मोठा धक्का माधव दिघेंना बसतो. कारण मोठमोठ्या रकमेचे चेक येणे बंद होते. दुसरीकडे साजिरी या चकचकीत वातावरणात इतकी गुंतलेली असते, की तिचं शूट बंद झाल्यामुळे एकाकी राहू लागते. घरातच शूटिंग-शूटिंग खेळू लागते. फॅन्सचे ऑटोग्राफ, सेल्फीज बंद झाल्याने निराश होते. पुढे काय  घडते  हे जाणून घेण्यासाठी ‘परी हूँ मैं’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.
‘परी हूँ मैं’ हा दिग्दर्शक रोहित शिलवंत याचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर चित्रपटाचे कथानक इरावती कर्णिक यांचे आहे. या चित्रपटाचा विषय आजच्या मनोरंजनसृष्टीसाठी ‘आजचा’ विषय आहे. कथा, पटकथा आणि संवादात यात साधेपणा आणि प्रामाणिकपणा आहे. पात्रांची सुयोग्य निवड चित्रपटाला अजूनही दर्शनीय बनवितो. उगाचच मोठे धक्के देण्याचे टाळत पटकथा वास्तविकतेकडे जास्त झुकते. दिघे कुटुंबीय आपल्याच आजूबाजूला बघितल्यासारखं वाटत राहतं यात दिग्दर्शकाचं यश आहे.
कलकरांच्या अभिनायबद्दल सांगायचे तर  बालकलाकार श्रुती निगडेच्या अभिनयात सहजता आहे. तिचा नैसर्गिक अभिनय मनाला भावतो, नंदू माधव  हे कसलेले अभिनेते  आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांनी माधव दिघे ही व्यक्तिरेखा सहज साकारली आहेत. देविका दफ्तरदार यांच्या कल्पना ला फार संधी नाही, मात्र त्यांनी काम उत्तम केले आहे. मराठीत पदार्पण करणारी अभीनेत्री फ्लोरा सैनी सुद्धा टीव्ही स्टारच्या भूमिकेत लक्षात राहतात. मेघना एरंडे, मंगेश देसाई केमियो मध्ये दिसतात.
संगीतकार समीर सप्तीसकर यांनी कथेला अनुरूप असे अफलातून संगीत दिले आहे, चित्रपटात  तीन गाणी आहेत आणि सर्वच गाणी कथा पुढे घेऊन जाण्याचे काम करतात. इतर तांत्रिक बाबी भक्कम आहेत. एकंदरीत सांगायचे तर कालानुरूप कथा, उत्तम पटकथा, गाणी, सुंदर अभिनय यासह आजच्या पालकांना विचार करण्यास भाग पाडणार ‘परी हूँ मैं’ वास्तवदर्शी चित्रपट आहे, यामुळे एकदा बघायला हवा.
चित्रपट – परी हूँ मैं
निर्मिती – डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, शीला सिंह
दिग्दर्शक – रोहित शिलवंत
संगीतकार – समीर सप्तीसकर
कलाकार – नंदू माधव, देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, श्रुती निगडे
रेटिंग – ***
भूपाल पंडित 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)