वाळू माफियांनी ढवळला कृष्णेचा डोह

धोम धरणालगत डेंजर झोनमध्येच सुरु आहे उपसा, महसूल विभाग अनभिज्ञ

महसूल-ठेकेदारांमध्ये आर्थिक तडजोडी?
कारवाईचा केवळ दिखाऊपणा
भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे बुडतोय लाखोंचा महसूल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेणवली, दि. 26 (प्रतिनिधी) – धोम धरण भिंती लगत हाकेच्या अंतरावर महसूल विभाग व धोम पाटबंधारे विभागाच्या कृपाशीर्वादाने कृष्णा नदीच्या पात्रात रात्रीच्यावेळी बेसुमारस वाळू उपसा सुरु आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्राची अक्षशर: चाळण झाली असून भविष्यात नदीचे पात्रच बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, वाळमाफियांनी नदीकाठावर असलेल्या झाडांचीही अडचण होत असल्याने कत्तल केली आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागासह महसूल विभाग मात्र या साऱ्या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याच्याच भूमिकेत वावरत आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वाळू उपशात या विभागांचे “अर्थकारण’ दडले असल्याचीच स्थानिकांमधून चर्चा सुरु असून वाळू माफियांनी कृष्णेचा डोह चांगलाच ढवळून काढला आहे.
धोमधरण भिंतीपासून हाकेच्या अंतरावरील मसत्यबीज केंद्राशेजारी शासनाने जाहीर केलेल्या (डेंजर झोन) धोकादायक परिसरात रात्रीच्या वेळी जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी वाळू उपसा सुरु असून रात्री उपसलेली वाळू लगेचच डंपर व ट्रॅलीने पहाटेच पळविली जात आहे. विशेष म्हणजे या गोष्टीची महसूल विभागाला कसलीही भणक लागली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून चिरीमिरीसाठी महसूल विभागाकडून जाणीवपूर्वकच याकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असलेले डेंजर झोन नदीपात्र जवळपास आठ एकर इतके कृष्णेचे जुने व नवे संगम ठिकाण असल्यामुळे वाळूचा मोठा साठा माफियांच्या हाती लागला असल्याचे बोलले जात आहे.

“महसूल’चा वाळूमाफियांशी तह?
धोमधरणालगत कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. विशेष म्हणजे स्थानिकांना मुठभर वाळूसाठी मज्जाव घातला असताना बेसुमार उपशावर महसूल विभागाकडून मेहरबानी दाखविली जात आहे. त्यामुळे जिल्हाभर वाळूमाफियांवर कारवाईचे सत्र सुरु असताना धोम धरणालगत सुरु असलेल्या वाळू उपशावर कारवाई होत नसल्याने महसूल विभागाने या वाळू माफियांशी तह केला आहे की काय? असा प्रश्‍न स्थानिकांमधून उपस्थित होत आहे.

कारवाईचा नुसता “फार्स’
धोम धरणाच्या भिंतीलगत म्हणजेच शासनाच्या निर्धारित डेंजर झोनमध्ये असणाऱ्या नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. या उपशामुळे धरणाच्या भिंतीसह मत्स्यबीज केंद्राला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र महसूल विभाग खाजगी वसुलीची भूमिका वटवत शहरातून तसेच महामार्गावरील वाळू वाहतुकीवर तोंडदेखली कारवाई करत आहे. वारंवार कारवाया होत असतानाही वाळू माफियांकडून अनधिकृत ठिकाणांवर वाळू उपसा सुरु असल्याने महसूल विभागाच्या कारभारावरच संशय व्यक्त होऊ लागला आहे. महसूल विभागाकडून कारवाईचा नुसता फार्स सुरु असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून धोम धरणालगत कृष्णा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. मात्र या प्रकाराची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कसलीही माहिती मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून महसूल विभागाचे अधिकारी आणि वाळू माफिया यांच्या तडजोडीच्या नात्याची विण दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचेच स्पष्ट होत आहे.
अविनाश फरांदे
भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)